शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंना मानाचा मुजरा

58

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी ‘शिवशाहीर सन्मान’ सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्य़गृहात रविवार, ३० जुलैला रात्री साडेआठ वाजता हा सोहळा पार पडणार असून त्याला स्वरगंधार आणि जीवनगाणी यांच्याकडून स्वरसाज चढवण्यात येणार असल्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.

तरुण वयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचल्यानंतर बाबासाहेब छत्रपतींचे भक्तच बनले आणि त्यानंतर शिवचरित्राच्या प्रसार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले सगळे आयुष्य खर्ची घातले. त्यांचा श्वास आणि ध्यास शिवाजी महाराजच झाले. त्यांनी स्वखर्चाने शिवचरित्र छापली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांनी १९८५ साली ‘जाणता राजा’ हे नाटक मराठी आणि हिंदी भाषांमध्ये आणले. हे नाटक २०० कलावंत सादर करत असत. त्यात खरेखुरे हत्ती, घोडे आणि उंट यांचा वापर करण्यात येत असे. ‘जाणता राजा’चे प्रयोग महाराष्ट्रासह देश आणि परदेशातही झाले आहेत. बाबासाहेब आपल्या व्याख्यानातून शिवचरित्राची शिकवण आजही देत असतात.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर सन्मानीय अतिथी म्हणून अॅड. आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून २९ जुलैपासून दीनानाथ नाटय़गृहात याचे वितरण केले जाणार आहे. यावेळी ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिफितीतील निवडक गाण्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या