आरोपीला मिळालेल्या जामिनाला ईडीचे आव्हान, तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पीएमएलए कायद्यानुसार अटक केलेले ओमकार ग्रुपचे संचालक बाबुलाल वर्मा व अध्यक्ष कमल गुप्ता यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या दोघांच्या जामिनाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास आज नकार देत ईडीला सत्र न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले.

ओमकार ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा तसेच अध्यक्ष कमल गुप्ता यांना सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 18 महिन्यांपूर्वी अटक केली होती. याप्रकरणी या दोघांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. 27 जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत न्यायालयाने जामीन मंजूर केला. या निर्णयाला ईडीच्यावतीने आज उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा, विशेष न्यायालयाने ईडीला उत्तर देण्याची संधी न देता दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केल्याचे ईडीच्यावतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, प्रकरण विशेष न्यायालयात अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. विशेष न्यायालयाने सुनावणी पूर्ण केल्यानंतर आम्ही सुनावणी ऐकू, असे स्पष्ट करत ईडीला विशेष न्यायालयात आपली भूमिका मांडण्याचे आदेश देत याचिकेवर सुनावणीस न्यायमूर्तींनी नकार दिला.