टिवल्या-बावल्या

172

शिरीष कणेकर,[email protected]

पटेल न पटेल असा…पटेल

काही कारण नसताना एकाएकी बाबुराव पटेलांची आठवण आली. समोर टेबलावर बाबुराव अर्नाळकरांवरचा ग्रंथ पडला होता, म्हणून कदाचित या दुसऱया बाबुरावांची आठवण आली असावी. बाबुराव पटेलांची आठवण यायला मला कारण कधीपासून लागू लागलं?

मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो. रात्री मला चाळायला आवडीचं काही सटरफटर घरात नव्हतं, नाइलाजानं मी इतके दिवस दूर ठेवलेल्या ‘फिल्मइंडिया’च्या अंकाकडे वळलो. आपण केवढय़ा मोठय़ा ठेव्याला नादानपणे मुकत होतो हे वाचायला सुरुवात केल्यावर काही मिनिटातच माझ्या लक्षात आले. मी अधाशाप्रमाणे तो जाडजूड ‘ग्लॉसी’ कागदावरचा अंक वाचून काढला. खुळावल्यासारखा झालो. बाबुराव पटेल या तोवर माहीत नसलेल्या माणसानं सबंध नियतकालिक एकहाती लिहून काढलं होतं. तरी ते कुठं रेंगाळत नव्हतं की कंटाळवाणं होत नव्हतं. वाचनीयता म्हणजे काय याचा पहिला अनुभव मला त्या रात्री ‘फिल्मइंडिया’नं दिला. (दुसरा अनुभव मी लिहायला लागल्यावरच मला आला. गंमत करतोय हो. गमतीच्या नावाखाली केलेली दर्पोक्ती इतर कोणाला नाही तरी बाबुरावांना आवडली असती.) त्यानंतर मी ‘फिल्मइंडिया’चे जुने अंक मिळवून वाचण्याचा सपाटा लावला.

त्यातले प्रश्नोत्तरांचे सदर हे ‘फिल्मइंडिया’चे प्रमुख आकर्षण होते. वाचकांचे इरसाल प्रश्न व त्यांना बाबुरावांनी दिलेली सवाई इरसाल उत्तरे असा तो खमंग मामला असायचा. बरीच पानं या प्रश्नोत्तरांनी भरलेली असली तरी आणखी पानं असायला हवी होती अशी चुटपुट लागून राहायची. उत्तरांच्या अनुषंगानं चितारलेली व्यंगचित्रे धमाल आणत. दादा कोंडकेंचा हजरजबाबीपणा या मराठमोळय़ा माणसाच्या लेखणीत होता. पाटील या आडनावाचे त्यांनी पटेल का केले कोण जाणे. सांप्रदायिकतेचा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असावे. परंतु त्यांच्या लेखणीतील मिरच्यांच्या ठेच्याचा झणझणीतपणा त्यांचा मराठी बाणा रणशिंग फुंकत वेशीवर यायचा. या बाबतीत त्यांचं तिसऱया बाबुरावांशी (पक्षी..आचार्य अत्रे) साधर्म्य होतं. व्यक्तिमत्त्वही तसंच भरदार. एका गृहकलहाचं वर्णन करताना पोटच्या पोराचा उल्लेख त्यांनी ‘ते माकड’ असा केल्याचं वाचल्याचं स्मरतंय. बाबुराव पटेल वॉज बाबुराव पटेल.

मॅट्रिकदेखील न झालेल्या या माणसाचं इंग्रजी भाषेवर इतकं प्रभुत्व कसं होतं हेच कळत नाही. १९३५ साली त्यांनी ‘फिल्मइंडिया’ सुरू केलं. बाबुराव हे हिंदुस्थानातील पहिले ‘फिल्म जर्नालिस्ट’ ठरले. त्यांच्या लेखणीवर वाचक लुब्ध होते. चित्रपटसृष्टीही त्यांच्या प्रभावाखाली आली. ‘यू लव्ह मी, यू हेट मी; बट यू कॅनॉट इग्नोअर मी’ हा त्यांच्या लेखणीचा बाज होता.

वाचकांतील निर्विवाद लोकप्रियतेमुळे चित्रपटसृष्टीला त्यांची दखल घेणं भाग पडलं. सिनेमावाल्यांना त्यांचा धाक होता, दडपण होतं. चित्रपटाचं परीक्षण लिहिताना त्यांची धारदार लेखणी वॉशिंग्टनच्या कुऱहाडीसारखी चालायची.

सपासफ मुंडकी धडावेगळी व्हायची. वास्तविक व्ही.शांताराम बाबुरावांचे मित्र होते. तरीही ‘डॉ. कोटणीसकी अमर कहानी’ या चित्रपटाविषयी लिहिताना त्यांनी बिनधास्तपणे लिहिले होते. ‘शांताराम हा डॉ. कोटणीसचा अपमान होते.’ आता ‘घुंघट’ चित्रपटाविषयी बाबुराव काय लिहितात पहा कमालीचा ताणलेला एक महामूर्ख विनोद.’ देव आनंदच्या ‘अफसर’विषयी ते लिहितात – ‘प्रकृतीस्वास्थ्यासाठी या चित्रपटापासून दूर रहा.’ कमाल अमरोहीच्या ‘दिल अपना और प्रीत परायी’विषयी त्यांनी लिहिलं होतं. ‘मीनाकुमारी चांगलं काम करते पण दिवसेंदिवस ती उलटय़ा ‘शटलकॉक’ (बॅडमिंटनचे फूल) सारखी दिसायला लागल्येय.’ बाबुरावांचं निरीक्षण व वर्णन अचूक होतं पण तरीही त्यांनी इतकं परखड मत या शब्दात मांडायला नको होतं असं वाटायचं ते वाटलंच. ‘सुरैय्या कुरूप आहे व देव आनंद बायल्या आहे’ या बाबुरावांचे हे स्फोटक मत सुरैय्या व देव आनंदच्या चाहत्यांनाच नव्हे तर चाहते नसलेल्यांनाही जरा झोंबलंच. बाबुराव डिड नॉट केअर. त्यांचं अभ्यासपूर्ण व प्रामाणिक मत त्यांना योग्य वाटेल त्या शब्दांत मांडायला ते मागेपुढे पहात नसत. त्याच कैफात त्यांनी एकदा दिलीपकुमारचा उल्लेख ‘केसाळ अस्वल’ असा केला होता. चित्रपटसृष्टी कमालीची नाराज झाली होती पण त्यामुळे बाबुरावांना काही फरक पडत नव्हता. कोणी ‘फिल्मइंडिया’च्या जाहिराती थांबवल्या तरी ते बेगुमानपणे लिहीतच राहिले. ‘हाथी चलता है, कुत्ते भोंकते है’ ही त्यांची मस्तवाल भूमिका होती. बाबुराव पटेल ही ‘वन मॅन आर्मी’ होती. कधीकधी मात्र त्यांचा वैयक्तिक आकस त्यांच्या बोचऱया लेखणीतून उतरतोय की काय अशी शंका यायची नाहीतर ‘सध्या दिलीपकुमारच राजेंद्रकुमारची नक्कल करीत असतो’ असे बेछूट विधान कोण करेल? कदाचित तो बाबुरावांचा काटेरी विनोद असू शकेल.

व्होल्टेअर नावाचा एक शेक्सपियरचा समकालीन ख्यातनाम समीक्षक होता. त्यानं लिहिलं – ‘शेक्सपियर हा गावंढळ बेवडय़ासारखा लिहितो.’ व्होल्टेअरपुढे बाबुरावांची लेखणी हळुवार व फुलासमान म्हणावी लागेल. शेक्सपियरविषयी गरळ ओकणारा समीक्षक आजही ख्यातनाम म्हणून ओळखला जातो याचा विचार व्हायला हवा. भल्याभल्यांची रेवडी उडवणारे बाबुराव पटेलही आद्य, आक्रमक, शैलीदार समीक्षक म्हणूनच आज त्यांच्या निधनानंतर पस्तीस वर्षांनी ओळखले जातात. स्वतःला ‘बंजारा’ म्हणवून घेण्यात त्यांनी कायम धन्यता मानली. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी आई गमावली. वकील वडिलांनी दुसरं लग्न केलं. पोरकेपणाचा तडफडाट बाबुरावांच्या स्वभावात व नंतर लेखणीत उतरला असावा. ‘अरे’ला ‘कारे’ म्हणायचं एवढंच जगानं व जीवनानं त्यांना शिकवलं होतं. अनेकदा तर स्वतःच ‘अरे’ म्हणून ते शाब्दिक मुष्टीयुद्धाला तोंड फोडत.

सुरुवातीला ‘फिल्मइंडिया’ची किंमत तीन आणे व वार्षिक वर्गणी तीन रुपये होती. ‘फिल्मइंडिया’ला हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही वाचक होते. पुढे जनसंघाच्या तिकिटावर बाबुराव लोकसभेवर निवडून आले. हळूहळू त्यांनी ‘फिल्मइंडिया’तला सिनेमा कमी केला. राजकारणावर भर दिला. यथावकाश त्यांनी ‘फिल्मइंडिया’चं नाव बदलून ‘मदर इंडिया’ केलं. चमकणारा ‘ग्लेझड्’ कागद गेला. अजूनही जाहिरातींसाठी म्हणजे पैशाचा ओघ चालू राहण्यासाठी बाबुरावांनी आपली लेखणी बटीक होऊ दिली नाही. लोकसभेत बाबुरावांनी विचारलेले प्रश्न व त्यांना सरकारतर्फे दिली गेलेली उत्तरे यांचे एक सदरच ते छापू लागले.

त्याचं नाव होतं – ‘द आन्सर्स दे गेव्ह मी.’ वास्तविक सरकारचा खोटेपणा, दांभिकपणा, सारवासारव यावर प्रहार करण्याची बाबुरावांना नामी संधी होती. पण त्यांनी कमालीचा संयम पाळला. वाचकांनी काय तो अर्थ लावावा अशी समंजस भूमिका त्यांनी घेतली. विवेकानंदांच्या शैलीत स्वतःचा फोटो छापून त्यांनी होमिओपाथीची औषधे विकली. तीनचार चित्रपट काढले. सगळे पडले. तृतीय पत्नी सुशीलाराणी पटेल हिला नायिका करून काढलेला ‘सैरंध्री’ हा अतिखर्चिक, महत्त्वाकांक्षी चित्रपटही कोसळला. ४ सप्टेंबर १९४२ रोजी बाबुरावांचं निधन झाल्यावर सुविद्य सुशीलाराणींनी जिद्दीने काही काळ ‘मदर इंडिया’चा डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटी ‘मदर इंडिया’ बंद पडलं. सुशीलाराणींचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. बाबुरावांच्या आठ हजार स्क्वेअर फुटांवर उभा असलेल्या टोलेजंग ‘गिरनार’ बंगल्याच्या मालकीवरून आता मारामाऱया चालल्यात. सुशीलाराणी शास्त्रीय संगीताच्या प्रसिद्ध गायिका होत्या. त्या मधुबालाला इंग्रजी शिकवायच्या अशी एक आख्यायिका आहे.

प्रश्नोत्तरच्या सदरात बाबुरावांनी दिलेल्या एका उत्तरानं मला खूप प्रभावित केलं होतं.

एका वाचकानं विचारलं होतं – ‘आशा पारेखविषयी तुमचं काय मत आहे?’

बाबुरावांनी उत्तर दिलं होतं – ‘आशा पारेखविषयी माझं काहीही मत नाही.’

मला पटलं. येता जाता मतांची पिंक टाकणाऱया  राजकारण्यांना बाबुरावांचं म्हणणं पटणार नाही. पटण्यासाठी कळायला तर हवं ना? प्रत्येक गोष्टीबाबत आपल्याला मत असायलाच हवं का?

मला कशाला कोण विचारतंय म्हणा, पण

समजा कोणी विचारलं की फलाण्या

लेखकाविषयी मत काय आहे तर मी

हेच सांगेन, ‘माझं  काहीही मत नाही.’

 

 

आपली प्रतिक्रिया द्या