शेपटीला जोडलेल्या गोळ्यासह जन्माला आले बाळ, विचित्र प्रकार पाहून डॉक्टर आश्चर्यचकीत झाले

फोटो सौजन्य: Journal of Pediatric Surgery Case Reports

मानवाला पूर्वी शेपूट होते, मात्र कालौघात ते गळून गेले असं म्हणतात. ब्राझीलमध्ये एक बाळ जन्माला आलंय ज्याला शेपटी होती. या शेपटीच्या डोकावर बुब्बुळाच्या आकाराचा एक मांसल गोळा देखील होता. बाळाच्या डाव्या कुल्ल्यावर हे शेपूट उगवलं होतं ज्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत. ब्राझीलमधील फोर्टालेझामधील अल्बर्ट साबिन रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचा जन्म आणि त्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेबाबतची माहिती ‘जर्नल ऑफ पेडिआट्रीक सर्जरी केस रिपोर्ट’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की गर्भात असलेल्या भ्रूणला शेपटी असते, मात्र भ्रूण मोठं होत जातं तसतशी ही शेपटी नाहीशी होत जाते. यामुळे जन्मानंतरही बाळाला शेपटी असणे ही दुर्मिळ घटना आहे. ही शेपटी मांसाची होती आणि त्यात कोणतंही हाड नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितले आहे. या बाळाचा मुदतीपूर्वीच जन्म झाला असला तरी बाळाच्या प्रसुतीमध्ये कोणतीही गुंतागुंत झाली नाही. हे बाळ सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही शेपटी मज्जासंस्थेशी जुळली नसल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती काढून टाकली. अशा प्रकारे शेपटी असलेलं बाळ जन्माला आल्याची घटना ही यापूर्वी 19 व्या शतकात घडली होती.