धावत्या एक्प्रेसमध्येच ‘मंगला’चा जन्म

45

गुहागर – कोकण रेल्वे मार्गावर मेंगलोर ते दिल्ली जाणाऱ्या मंगला एक्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी संगमेश्वर ते सावर्डे रेल्वे स्थानकादरम्यान एक महिला प्रसूत झाली. धावत्या गाडीमध्येच झालेल्या प्रसुतीनंतर थांबा नसतानाही सावर्डे स्थानकावर ही एक्प्रेस थांबवून सदर महिलेला डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रेल्वेतील प्रवाशांनी संबंधित महिलेला आर्थिक मदत दिली. यामुळे भारावून गेलेल्या संबंधित कन्येच्या पित्याने आपल्या कन्येचे नाव ‘मंगला’च ठेवणार असल्याचे जाहीर केले.

रवींद्रकुमार विश्वकर्मा (मेंगळूर, मुळगाव उत्तरप्रदेश) हा गेल्या तीन वर्षांपासून मेंगळूर येथे पाणीपुरीची गाडी चालवत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचे सासरे मयत झाल्याने तो आपली पत्नी ज्योती झा उर्फ ज्योती विश्वकर्मा हिच्यासह उत्तरप्रदेश येथे मंगला एक्प्रेसमधून मेंगळूर ते झाशी असा एस- २ या बोगीतून प्रवास करीत होता. रत्नागिरी स्थानक सोडल्यानंतर ज्योतीला प्रसुती वेदना सुरू झाल्या. पतीने याबाबतची माहिती बोगीतील अन्य प्रवासी महिलांना दिली. त्यानंतर या महिलांही मदतीसाठी सरसावल्या. सुदैवाने या बोगीतून दोन नर्स महिलाही प्रवास करीत होत्या. त्यामुळे त्यांनी तिला योग्य ते सहकार्य केले.

याबाबतची माहिती रेल्वे कर्मचाऱयांनी वरिष्ठांना दिल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासंदर्भातील सूत्रे गतीने हलली. याबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकाऱयांनी जवळच्या सावर्डे व चिपळूण स्थानकाला दिली. त्यानुसार सावर्डेतून डेरवण रूग्णालयाला याची माहिती दिली गेल्यानंतर त्यांनी तात्काळ आपली रूग्णवाहिका सावर्डे रेल्वेस्थानकावर पाठवली, तर चिपळूण स्थानकावरही दुसरी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. दरम्यान, सावर्डे स्थानकावरच गाडी थांबवून सदर महिलेला डेरवण रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

या प्रकारानंतर या रेल्वेतून प्रवास करणाऱया अनेक कर्मचाऱयांनी विश्वकर्मा याला मदतीचा हात देतानाच सुमारे १५०० रूपये जमा करून दिले. तसेच कारवार येथील प्रवासी व नाशिक येथे उतरणाऱया एका प्रवाशाने त्याला चक्क 2 हजार रूपये देऊ केले. प्रवाशांकडून झालेल्या या आर्थिक सहकार्याबद्दल विश्वकर्मा याने सर्वांचे आभार मानले. ज्या मंगलामध्य आपल्याला कन्यारत्न झाले व प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडवले त्याची आठवण म्हणून कन्येचे नामकरणही ‘मंगला’ करण्याचे त्याने जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या