
राज्यातील मिंधे सरकारचे समर्थक आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद नवा नाही. काही दिवसांपूर्वी खोके घेतल्याच्या आरोपांवरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला होता. मात्र आता पुन्हा राणा आणि कडूंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
राणा दांपत्य आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील वादात उडी घेत बच्चू कडू यांनी मध्यंतरी एक विधान केले होते. या विधानाचा समाचार घेत रवी राणा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्रिपदासाठी बच्चू कडू यांनी सरकारला ब्लॅकमेल केले होते, त्यांना आता आवर घालण्याची गरज आहे, असे रवी राणा यांनी म्हटल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
खऱ्या अर्थाने बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज आहे. मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करून जो माणूस काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो, त्याला आवर घालायची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांनी रवी राणाला आवर घातली पाहिजे, हा सल्ला त्यांनी दिला. पण ज्या माणसाला खरी आवर घालण्याची गरज आहे, त्यांनी मला सल्ला देऊ नये, असे रवी राणा म्हणाले.
पैसे देणाऱ्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे! बच्चू कडूंच्या विधानानं राणा दांपत्य अडचणीत
नक्की प्रकरण काय?
यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत राणा दांपत्याचा प्रचार करण्यासाठी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. या वादामध्ये बच्चू कडू यांनीही उडी घेत पैसे देणाऱ्याचीही चौकशी करायला हवी म्हणत राणा दांपत्याला अडचणीत आणले होते.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
नवनीत राणा जे विधान केलं, त्यावर आम्ही पत्र देणार आहोत. पैसे देणं आणि घेणं दोन्ही चूकच आहे. त्यांनी स्वत: म्हटलं दिलं. याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सत्य समोर यायला हवं. स्वत: उमेदवार म्हणतोय की आम्ही पैसे दिले. मग पहिला दोषी कोण देणारा आणि घेणारा पण तेवढाच दोषी आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले होते.