नवनीत राणांच्या मतदारसंघावर बच्चू कडूंचा दावा

अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहारच्या बच्चू कडू यांनी दावा केल्याने खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असून भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असे बच्चू कडू म्हणाले.

काही दिवसांपूर्वी गुवाहाटीतील सौदेबाजीवरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचले होते. यावेळी दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. नंतर हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत आला होता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मात्र आता बच्चू कडू यांनी थेट रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे या वादाला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची तयारी असून मी देखील या मतदारसंघातून विधानसभा लढलो होतो. कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेताही मी लढलो आणि 5 हजार मतांनी पडलो. त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारही सज्ज आहे, असे बच्चू कडू म्हणाले. नवनीत राणांविरोधीत लढण्याची वेळ आली तरीही त्या ताकदीचा आमचा उमेदवार असल्याचेही ते म्हणाले. तसेच विधानसभेसाठी 15-20 जागांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

‘गुवाहाटी’च्या सौदेबाजीचे बिंग फुटले! खोक्यांवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद पेटला

देशात मोदींचे सरकार असून राज्यात देवेंद्र फडणवीस प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. कोण कुठली जागा मागतेय याचा निर्णय मोदी, अमित शहा आणि फडणवीस घेतील. कोणी कितीही दावे केले तरी ते खोडून काढण्याची ताकद रवी राणामध्ये आहे, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर दिली.