विकास कामाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बच्चू कडूंनी थोबडावले

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे पुन्हा वादात सापडले आहेत. बोलताना मध्ये अडवल्याचा राग आल्याने कडू यांनी एका माणसाच्या कानाखाली मारली आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काहींना कानाखाली खाणारा हा माणूस त्यांच्याच प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे तर काहींनी म्हटले आहे की हा माणूस विकासकामांबद्दल बोलणारा सर्वसामान्य नागरीक होता.

ही घटना अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या गावात बच्चू कडू गेले होते आणि विकासकामाच्या मुद्द्यावरुन तिथे वाद सुरू झाला होता. ज्या व्यक्तीला कानाखाली मारण्यात आली आहे, ती व्यक्त काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, ज्याचा राग आल्याने बच्चू कडू यांनी त्याला ‘ऐकून घे आधी, शांत बस’ असे म्हणत दरडावले होते. यानंतर त्यांनी या व्यक्तीच्या कानाखाली मारली

चांदूरबाजार तालुक्यातील गणोजा गावामध्ये बच्चू कडू हे एका रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कामासाठी आले होते. यावेळी स्थानिकांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. एका व्यक्तीशी बच्चू कडू हे बोलत असताना ज्या व्यक्तीचा कडू यांनी कानाखाली मारली तो मध्येमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होता. याचा राग आल्याने कडू यांनी त्याच्या कानाखाली मारली.