मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप- शिंदे गटात अस्वस्थता; बच्चू कडू यांनी पुन्हा व्यक्त केली नाराजी

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार काही महिन्यांपासून रखडला आहे. फक्त 20 मंत्रीच राज्याच्या कारभारचा गाडा हाकत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप आणि शिंदे गटातील नाराजी आणि अस्वस्थता उफाळून येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास असंतोष रोखणे कठीण होईल, या भीतीमुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याच्या चर्चा आहेत. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून भाजप आणि शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. आमदार बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची त्यांची नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही नावे चर्चेत आहेत. प्रत्येक आमदार मंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार, याच्या चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांच्याही नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन स्पष्ट करायला हवे, असे आमदार कडू यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल अजून काही खरं दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली पाहिजे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टता झाली पाहिजे. कारण विस्तारावरून बऱ्याच आमदारांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. 9 शिंदे गटाचे आणि 9 भाजपाचे मंत्री आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील 4 महिन्यापासून रखडला आहे.