मानवत ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था

सामना प्रतिनिधी । मानवत

मानवत येथील ग्रामीण रुग्णालय हे वैद्यकीय अधीक्षकांच्या नाकर्तेपणामुळे निव्वळ सलाईनवर असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे.

मानवत येथे जनतेच्या आरोग्य समस्या सोडवण्यात याव्यात, या करीता तालुका स्तरीय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती. या रुग्णालयात स्थानिक असलेले डॉ. संदीप काला, व स्व. डॉ. दिलीप पेनसालवार आदींनी आपल्या कामाचा ठसा गेल्या १० ते १५ वषांपूर्वी उमटवला होता. अगदी नजीकच्या काळात डॉ. विक्रम पाटील व डॉ. अंकुश लाड यांनी आपल्या कामाने रुग्णालय हे उच्च दर्जाचे केले होते. परंतु वैद्यकीय अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाची दूरवस्था झाली आहे. सध्या या रुग्णालयात एकूण चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु यातील एकच हजर असतो. उर्वरीत कर्मचारी कुठे असतात याचा ताळमेळ नसतो. तसेच स्वतः वैद्यकीय अधीक्षक हे आठवड्यातून केवळ २ दिवस येत असल्यामुळे बाकीचे कर्मचारी हे देखील आपापल्या पध्द्तीने ड्युट्या बजावतात. त्यात ७ परिचारिका आहेत. त्यापैकी केवळ २ जण मुख्यालयी राहतात. बाकी मात्र आपल्या सोयीप्रमाणे अप-डाऊन करतात. तसेच कार्यालयीन अधीक्षक हे रेल्वेच्या वेळापत्रक नुसार कार्यालयात हजर होतात. त्यामुळे रुग्णालय कामकाज खोळंबल्या जात आहे. याकडे मात्र वैद्यकीय अधीक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसते.

रुणालयातील गंभीर बाब म्हणजे वैद्यकीय अधीक्षकासह इतर २ डॉक्टर हे स्त्री रोग तज्ज्ञ असताना देखील रुग्णालयात प्रसूतीचे रुग्ण हे परभणीला रेफर करण्यात येतात. तालुका स्त्री रुग्णालयात दर महिन्यास ९० ते १०० प्रसूतीचे रुग्ण अपेक्षित असताना मानवत रुग्णालयात मात्र गेल्या महिन्यात केवळ १२ प्रसूती झाल्याचे दिसून आले. १२ प्रसूती ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रात होत असतात. पण हेच काम या रुग्णालायात होत असून वरिष्ठ प्रशासन का गप्प आहे? हा संतप्त सवाल मात्र अनुत्तरित आहे.

रुग्णालयात तीस खाटा असून त्या नेहमीच रिकाम्या असतात. कारण डॉक्टर केवळ ओपीडीमध्ये बसून राहतात. त्यांचा रुग्णालयात रूग्ण दाखल करण्याकडे कल नसतो. कारण त्यांचे काम त्यामुळे वाढते. म्हणून ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णास तात्पुरते तपासून रुग्ण काढून देण्याचा घाट येथील डॉक्टर करीत आहेत. तसेच या रुग्णालयात नवीनच प्रकार पाहण्यास मिळाला येथील वर्ग चार कर्मचारी त्यांची ड्युटी करण्यासाठी त्यांच्या जागेवर खाजगी व्यक्ती असल्याचे बाब उघडकीस आली. याच खाजगी माणसा कडून रुग्णांना जखमेस पट्ट्या करणे, टाके मारणे, प्रसूती मध्ये साहाय्य करणे अशी कामे बिनदिक्कत करवून घेतली जात आहेत. या प्रकाराकडे वैद्यकीय अधीक्षकांचा कानाडोळा करून दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, मानवत ग्रामीण रुग्णालयाच्या अशा या अनागोंदी कारभाराबाबत वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रूग्णालय सेवा सुधरावी अन्यथाप वरिष्ठ प्राशसनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आपण तीव्र आंदोलन उभे करू असे रुग्णकल्याण समिती सदस्य शिवाजी पाटील व राजेश कच्छवे यांनी दै.‘सामना’ शी बोलताना सांगितले.