भंडार्‍याच्या जंगलाचा टाहो

91

>> मु. रा. चौधरी (निवृत्त वनाधिकारी)

मध्यंतरी एका वृत्तवाहिनीवर बातमी झळकली ती अशी की, भंडार्‍याचे २१ हजार हेक्टर जंगल वन विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा आदेश मंत्रालयातून निघाला आहे. ती बातमी ऐकून धक्का बसला. वन विकास महामंडळ अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंतची वाटचाल पाहता फारसे आशादायक चित्र नाही. बापाच्या पैशांवर मजा करणार्‍या मुलासारखी या महामंडळाची अवस्था आहे. खरे म्हणजे वन विभागाकडे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध असताना किंवा उपलब्ध करण्याची क्षमता असताना एवढे मोठे जंगल वन विकास महामंडळाकडे का दिले जात आहे याची पार्श्‍वभूमी जाणून घेतली तर अनेक गोष्टी लक्षात येतील. १९७० च्या दशकात वन विकास महामंडळाची स्थापना झाली तेव्हा असा तर्क देण्यात आला होता की, जागतिक बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळवायचे आहे. त्यासाठी एखादे स्वायत्त महामंडळ असले तरच त्या महामंडळाला जागतिक बँक कर्ज देऊ शकते.

अशी वस्तुस्थिती असताना वनांच्या सुधारणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा उद्देश अमलात आला. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ स्थापन करताना अशा प्रकारे जागतिक बँकेच्या कर्जावर नजर ठेवून वन विकासाचा मुलामा देण्यात आला. वन विभागाचे जंगल वन विकास महामंडळाकडे दिले की, त्या जागी पूर्ण तोड करून नवीन बहुमूल्य जातीच्या प्रजाती उगवायच्या आणि आदर्श जंगल तयार करायचे ही ती भूमिका होती. जंगलाची पूर्ण तोड करणे हे त्या जंगलाचा पोत बिघडवून जमिनीची झीज होणे आणि पर्यावरणास असंतुलित करणे या दोषास आमंत्रण देणे होय, हे वानिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या वनरक्षकांपासून हिंदुस्थानी वन सेवेच्या अधिकार्‍यांपर्यंत सर्वांना तोंडपाठ असतो. असे असताना असा निर्णय होणे सर्वतोपरी अयोग्य होय.

टीव्हीवर ज्या वेळेला ही बातमी दाखवली त्या वेळेस त्या जंगलाचे चित्रण दाखवण्यात आले. त्यात समृद्ध जंगल योग्य त्या वाढीसह दिसत होते. त्या समृद्ध जंगलात वाघांना सुखेनैव फिरताना पाहून बरे वाटले. विशेष म्हणजे या जंगलात वाघ आपल्या ऐटीमध्ये फिरताना पाहून इतर शाकाहारी, मांसाहारी प्राण्यांचे अस्तित्वही दिसून आले.

पर्यावरणाच्या त्रिकोणामध्ये वाघाला शिखरावर कल्पिलेले आहे. याचा अर्थ त्या जंगलात गवत, शाकाहारी प्राणी जसे चितळ, ससे, शाकाहारी प्राण्यांवर जगणारे छोटे प्राणी जसे लांडगे, तरस इ. प्राणी, वाघासारखे अजस्र प्राणी अशी अन्न साखळी व्यवस्थित आहे. मात्र ही अन्न साखळी विस्कळीत पर्यावरणाला हानी पोहोचवते हा सर्वमान्य सिद्धांत पायदळी तुडवण्यासारखे आहे. या ठिकाणी वाघ सुखेनैव फिरत आहे याचा अर्थ ते जंगल समृद्ध आहे आणि हे सांगण्यास कुणा ज्योतिष्याची गरज नाही.

पूर्वी जंगलातून पैसा मिळवून देणार्‍या प्रजातींना प्राधान्य क्रमाने महत्त्व दिले जायचे. फर्निचर, घरबांधणी यासाठी लागणार्‍या सागवान, शिसम इ. प्रजातीची काळजी घेतली जायची. आता काळ बदलला आहे. आता वनांच्या उपयोगितेचा प्राधान्य क्रम बदललेला आहे. पर्यावरण संतुलनाला सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे आणि तेच उद्दिष्ट योग्य आहे. असे असताना मूळ गाभ्याला हात लावून जंगलांचे आक्रंदन पाहत बसणे योग्य नव्हे.

आज कोणत्याही वरिष्ठ आजी-माजी वनमंत्र्यांनी प्रतिज्ञेवर सांगावे की, वन विकास महामंडळाच्या नावाप्रमाणे वनांचा विकास झाला आहे काय? कुणीही पुढे येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अहो विकास सोडा, सगळे भकासच झाले आहे. मी वनाधिकारी म्हणून काम करीत असताना अनुभवलेले आहे. उघडेबोडके डोंगर ही गंभीर समस्या आहे. त्यात आणखी इतर समृद्ध जंगल उघडे बोडके करणे योग्य नव्हे. वन विकास महामंडळाला २१ हेक्टर जंगल सुपूर्द करण्याची कल्पना, तो आदेश मागे घेतल्यास जंगल दुवा देईल. जंगलातील प्राणी, आदिवासी यांच्या हितासाठी हे जंगल वर्ग करू नये. भंडार्‍याच्या जंगलाचा हा टाहो सरकार ऐकेल का?

आपली प्रतिक्रिया द्या