सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही; उद्यापासून महाराष्ट्रात आंदोलन छेडणार- अंबादास दानवे

लाडकी बहीण फक्त पोस्टर्सवर सुरक्षित ठेवणारे खोके सरकार प्रत्यक्षात बहिणींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास विलंब केल्यामुळे हा जनआक्रोश उफाळून आला. संतप्त नागरिकांनी  बदलापूर रेल्वे स्थानकात धाव घेऊन रेल रोको केला. या आंदोलनकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा योग्य नव्हता. हे आंदोलन फक्त आता बदलापूर पुरते मर्यादीत राहिलेले नसून उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर छेडण्यात येणार आहे, असा इशारा  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

दानवे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, रेल्वे पोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शितल देवरुखकर शेठ, ज्योती ठाकरे, राजुल पटेल, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, जिल्हा संघटक वैशाली दरेकर आदी उपस्थित होते.

पत्रकार संघटनांकडून मिंधे गटाचे मस्तवाल वामन म्हात्रे यांचा निषेध

बदलापूरच्या घटनेनंतर एका महिला पत्रकाराला अत्यंत असभ्य भाषेत मस्तवालपणे बोलणारे मिंधे गटाचे बदलापूर शहरप्रमुख आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषद, शहापूर तालुका पत्रकार संघ, भिवंडी पत्रकार संघ, प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली व राज्यभरातील ठिकठिकाणच्या अन्य पत्रकार संघटनांनी निषेध केला असून म्हात्रेंवर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

कायद्याचा धाक राहिला नाही – वडेट्टीवार   

कायद्याचा धाक नसल्याने गुंड प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात ताठ मानेने वावरत आहेत. अशा लोकांना सरकारमधील काही मंत्री मदत करत आहेत. विशिष्ट समुहाची संस्था असल्याने आरोपीला वाचवलं जातं आहे. या प्रकणात कारवाई करण्यास कमालीची दिरंगाई करण्यात आली. बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

पोलिसांची दिरंगाई संतापजनक – आव्हाड

अत्याचाराच्या गुह्याची नोंद करण्यासाठी बारा तास वाट बघावे लागणे पालकांसाठी याहून मोठे दुःख कोणते असू शकते. बदलापुरातील घटना वेदनादायी असली तरी पोलिसांकडून झालेली दिरंगाई संतापजनक आहे. मोठा भाऊ म्हणत आलेल्या केंद्र सरकारकडून यांनी अजून महाराष्ट्र शक्ती विधेयकही मंजूर करून घेतले नाही अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशी द्या – सुप्रिया सुळे

ही एकदम घाणेरडी विकृती आहे. हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असं वागण्याची भीती वाटली पाहिजे, कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे, हात लावणं तर दूरची गोष्ट पण पाहताना देखील दहा वेळा विचार केला पाहिजे. या सरकारला आपल्या लेकाRना न्याय देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

शिवसेनेच्या वतीने लालबागमध्ये आज जनआक्रोश आंदोलन

बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभेच्या वतीने उद्या, बुधवारी सकाळी 11 वाजता सेंट्रल पाईंट, भारतमाता सिनेमा समोर, लालबाग येथे जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते  अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात शिवडी विधानसभेतील वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, शाखाप्रमुख, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक सहभागी होणार आहेत.