बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची सरकारने अतिशय गंभीर दखल घेतली असून यातील दोषीला कडक शिक्षा करण्यात येईल. यासाठी हा खटला तातडीने जलदगती न्यायालयात चालविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
बदलापूर पूर्वेकडील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आले पाहिजे अशी यंत्रणा हवी, असे त्यांनी सांगितले.