Badlapur Sexual Assualt आमच्यावर प्रेशर आहे, तक्रार नोंदवायला उद्या या! महिला पत्रकाराला पोलिसांचं धक्कादायक उत्तर

 

बदलापुरात शाळेतील दोन विद्यार्थिनींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मंगळवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त केला. आठ तास रेल्वे मार्ग रोखून धरला. यावेळी विविध पत्रकार वार्तांकन करत होते. यात वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराला मिंधे गटाचा पदाधिकारी वामन म्हात्रे याने अशा प्रकारे रिपोर्टिंग करते जणू तुझाच रेप झाला आहे, असं गंभीर विधान केलं. याविरोधात पत्रकारांनी निषेध नोंदवला आणि तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र दीड दिवस उलटूनही महिला पत्रकाराची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली आहे. तसेच आंदोलनामुळे आमच्यावर प्रेशर आहे, तक्रार नोंदवायला आज नको उद्या या, असं म्हणत पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला आहे.

दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांनी बीबीसी न्यूज मराठी सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी मंगळवारपासून त्यांच्यासोबत काय घडलं याची संपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘बदलापुरातील आंदोलनाचं मी वार्तांकन करत होते. शाळेच्या परिसरातील आंदोलन, रेल्वे स्टेशनवरील आंदोलन कव्हर करून मी घरी जाऊन जेवले. त्यानंतर पुन्हा एकदा शाळेतील आंदोलन कव्हर करण्यास जात होते. त्यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे हे शाळेकडून येत होते. तेव्हा ते म्हणाले काय मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावता, बातम्या करता आणि निघून जाता. त्यावर मी म्हणाले आम्ही असं काय केलं आहे. ते म्हणाले की तुम्ही बातमीची शहानिशा करायला पाहिजे होती की नक्की बलात्कार झाला आहे की विनयभंग? तर मी म्हटलं शहानिशा करून बातमी केली आहे. त्यावर ते म्हणाले की तुमच्या सर्व पत्रकारांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, पत्रकारांना पोलिसांनी अटक करायला पाहिजे. तर मी त्यांना म्हणाले की तसं तुम्ही पोलिसांना सांगा. यावर ते चिडले आणि म्हणाले की, काय तुझा रेप झाला आहे का? की तू बातमी करायला आली आहे’.

यानंतर महिला पत्रकार या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या पण त्यांची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. दीड दिवस उलटून देखील त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही.