बडोदा सज्ज होतंय…

शिबानी जोशी

साहित्य संमेलन अगदी काही दिवसांवर आलंय. गुजरातेतील बडोदा नगरी या मराठमोळ्या उत्सवासाठी तयार होते आहे…

१९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान गुजरातमधल्या बडोदे नगरीमध्ये होत आहे. त्यासाठी बडोदे नगरी सज्ज होत आहे. बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड हे कर्तव्यदक्ष, प्रजाहितकारी होते. त्यांच्याबरोबर अनेक मराठी जन बडोदे संस्थानात गेले. पुढे रेल्वेसारख्या नोकऱया, व्यवसायाच्या निमित्तानेही अनेक मराठी लोक बडोद्यात स्थायिक झाले. एकतर महाराष्ट्रापासून अगदी जवळ, मुंबईपासून पाच-सहा तास आणि डहाणूपासून तीन-चार तासांवर असल्यामुळे मराठीशी त्यांची नाळही जुळून राहिली. काही वर्षांपूर्वी ३५ ते ४० टक्के मराठी लोकांची बडोद्यात वस्ती होती. आज सर्वच शहरांत स्थलांतर होत असल्यामुळे २० ते २५ टक्के मराठी लोकांची संख्या बडोद्यात राहिली आहे. मुंबईतच आज मराठी टक्का २५ ते ३० राहिला असताना बडोद्यात मराठी लोकांची संख्या लक्षणीयच म्हणायला हवी. बडोद्यात आजही मराठी लोकांच्या जवळ जवळ ३० ते ३२ सामाजिक, सांस्कृतिक संस्था कार्यरत आहेत. मराठी साहित्य परिषद, मराठी नाटय़ संस्था, ब्राह्मण सभा, व्यायामशाळा, मराठी वाचनालय, इतकंच काय मराठी शाळासुद्धा बडोद्यात आहेत. या सर्व संस्थांमध्ये संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत जसे खास मराठमोळी वस्ती असलेले भाग आहेत तसेच दांडिया बाजारसारखे बहुसंख्य मराठी वस्ती असलेले भाग बडोद्यात अजूनही आहेत. यातल्या अनेक संस्थांतले कार्यकर्ते संमेलनासाठी काम करीत आहेत.

गेली काही वर्षे साहित्य संमेलन म्हणजे जेवणावळी झोडणं असं स्वरूप संमेलनाला आलं होतं. सयाजीरावांनी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी बडोदे शहराचं ज्या रीतीने प्लॅनिंग केलं होतं, ते प्लॅनिंग पाहण्याचं भाग्यही लाभणार आहे. इतकी वर्षे झाली, बडोदे शहराची पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था इतकी उत्तम आहे की, वाढत्या लोकसंख्येला, वाढत्या शहराला ती आजही व्यवस्थित सेवा पुरवत आहे. गुजराती माणसं ही खाण्याचे दर्दी आहेत असं मानलं जातं. तेही आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. कारण बडोद्यात जागोजागी विविध प्रकारची हॉटेल्स, आईक्रीम पार्लर्स आपल्याला आकर्षित करतील. अर्थात या सामाजिक संस्कृतीबरोबरच साहित्यिक मेजवानीसुद्धा भरभरून आहे. तीन दिवस परिसंवाद, चर्चा, विविध भाषिक कविसंमेलन, बोलीभाषा व कविसंमेलन असे कार्यक्रम सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दररोज संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत तीन मुख्य कार्यक्रम राहतील अशी माहिती मराठी वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर यांनी दिली. पहिल्या दिवशी ‘मराठी भाषासुंदरी’ या कार्यक्रमात ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषेचा प्रवास कसा झाला, भाषा कशी बदलत गेली आणि भाषेतील सौंदर्यस्थळं दर्शवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठीत अतिशय साधेसोपे, सुमधुर गीत देणारे  श्रीनिवास खळे हे बडोद्याचे होते. त्यामुळे त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी दुसऱया दिवशी ‘समग्र खळे दर्शन’ हा कार्यक्रम होईल व तिसऱया दिवशी संपूर्ण बडोद्यातील मराठी कलाकार ‘बडोदे कलावैभव’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. बडोद्यालासुद्धा एक चांगली कीर्तन परंपरा आहे व चांगले कीर्तनकार तिथे होऊन गेले आहेत. त्यामुळे कीर्तनापासून गणगवळणीसह कथ्थक, भरतनाटय़म, नाटय़गीत, भावगीत असा मराठमोळा संगीत नजराणा बडोदेकर पेश करणार आहेत.

परिसंवादातही ‘अनुवाद (विशेषकरून मराठी-गुजराती) -समस्या आणि उपाय’, ‘सयाजीराव गायकवाड यांचं आधुनिक भारताचं स्वप्न आणि योगदान’ असे काही विषय घेतले आहेत. तर कविसंमेलनात मराठी, गुजराती, हिंदी व उर्दू अशा चार भाषांचं विविधभाषी संमेलन होणार आहे. बोलीभाषेतील कवितांच्या संमेलनात मुख्यत्वे मराठी व गुजराती बोलीभाषांचा समावेश केला गेला आहे.

साधा, पण वैविध्य असलेला, गुजराती संस्कृतीची चव दाखवणारा बेत आखण्यात आला आहे. आज आपण सर्व राज्यांतील जेवणाची चव मुंबईतल्या हॉटेलमध्ये चाखू शकतो, पण खास तिथल्या बल्लवाचार्यांनी बनवलेले जेवण संमेलनाची लज्जत वाढवणार आहे. इथे उंधियो, कढी, खिचडी, गुजराती पद्धतीची दाल, कन्सार, गोटा भजी, खमण ढोकळा, खांडवी, फापडा असे पदार्थ चाखायला मिळणार आहेत.