लोहारा गावातील विहिरीत सापडली आधार कार्डांनी भरलेली बॅग

50

सामना प्रतिनिधी । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा गावातील साई मंदिर परिसरात विहिरीतील गाळ काढताना तब्बल १५२ आधारकार्ड असलेली बॅग सापडली आहे. याप्रकरणी नायब तहसीलदाराच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गावात २०१३ ते २०१५ दरम्यान आधार कार्डासाठी नोंदणी करणाऱ्या ग्रामस्थांना आधार कार्डच मिळाले नव्हते त्यामुळे या ग्रामस्थांचीच ही आधारकार्डे असावीत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार सचिन शेजाळ यांना चौकशीचे आदेश दिले.

या प्रकरणात नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या तक्रारीवरून डाक विभागातील अज्ञात पोस्टमनविरोधात भादंवि ४०९ नुसार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डाक विभागातून वाटपासाठी गेलेले आधारकार्ड परस्परच फेकून देण्यात आले. या गंभीर प्रकरणाची अद्यापपर्यंत डाक विभागाने दखल घेतली नाही. याबाबत कार्यालयीन चौकशी करून त्या काळात लोहारा परिसरासाठी कोण पोस्टमन कार्यरत होता त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. आता प्रकरण पोलिसांकडे गेल्याने सर्वच जण अडचणीत येण्याची शक्यता आहे. डाक विभागाच्या अनियंत्रित कारभाराचा हा धडधडीत पुरावा हाती लागला आहे. यवतमाळच्या डाक विभागाचे अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने अनेक गंभीर प्रकरणे येथे घडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या