परराज्यातील बॅगलिप्टरला अटक; सव्वापाच लाखांची रोकड जप्त

कवठेमहांकाळमधील घटना; आंध्र प्रदेशातील आरोपी गजाआड

कवठेमहांकाळमधून दहा लाखांची बॅग घेऊन पसार झालेल्या बॅगलिफ्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. सलमान शंकरय्या चल्ला (वय 52, रा. कपरालथीप्पा, बिटरगुंट्टा, ता. कवाली, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सव्वा पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील शामराव महादेव कोळेकर यांनी 26 जून रोजी कवठेमहांकाळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून दहा लाख रुपये काढले होते. ती रक्कम पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांनी मोपेडला लावलेली होती. ते मोपेडवरून घरी निघाले असताना, वाटेतच एका अनोळखीने त्यांना तुमचे पैसे खाली पडल्याचे सांगितले. रस्त्यावर विखुरलेले पैसे गोळा करण्यात शामराव कोळेकर हे मग्न असतानाच, त्यांच्या मोपेडला लावलेली दहा लाखांची रोकड असलेली पिशवी गायब झाली. या घटनेनंतर सैरभैर झालेल्या कोळेकर यांनी हा प्रकार कवठेमहांकाळ पोलिसांत सांगितला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. परंतु चोरटा अद्यापि सापडलेला नव्हता. या गुह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक स्वतंत्र पथकही तपास करत होते. या पथकातील पोलीस अंमलदार सागर लवटे यांना संबंधित गुह्यातील चोरटा हा आंध्र प्रदेशातील बिटरगुंट्टा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या पथकाने बीटरगुंट्टा येथे जाऊन संशयित सलमान चल्ला याला शोधून काढले. सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने सलमान याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने कवठेमहांकाळ येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने स्वतःहून त्यावेळी चोरलेल्या दहा लाखांपैकी 5 लाख 25 हजारांची रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पवार, सागर लवटे, दऱ्याप्पा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमर नरळे, अनिल कोळेकर, उदय माळी आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली.