बागलाण तालुक्यात पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

534

सामना ऑनलाईन, सटाणा

बागलाण तालुक्यातील अंतापूर मोसम नदीवरील मांगीतुंगी, भिलवाड, तुंगण, दसवेल गावांसह पांढरी कुत्तुरवाडी आदिवासी लोकवस्तीतील नागरिकांना दळणवळणासाठी असलेला पूल एका बाजूने वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून रहदारी सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या भागात 3 ते 5 ऑगस्टदरम्यान हरणबारी धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो होऊन मोसम नदीला महापूर आला होता. त्या पुरामध्ये पुलाचा एका बाजूचा भराव व काही गाळे वाहून गेल्याने नुकसान झाले. या पुलावरून अनेक गावांसह श्री दावल मलिक बाबा क्षेत्र, मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी येणारे भाविक तसेच आदिवासी क्षेत्रातील द्वारकाधीश साखर कारखान्यातील कर्मचारी, मजूर यांना याचा फटका अधिक बसला आहे.

दळणवळणाचे साधन नसल्याने मोठय़ा प्रमाणात शेती पिकांसह कांदा, टोमॅटो, भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. सदर पूल जिल्हा परिषदअंतर्गत येत असल्याने पंचायत समिती उपविभागीय अधिकारी सी. पी. खैरनार, शाखा अभियंता सतीश कापडणीस यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. वरिष्ठ विभागाला अहवाल कळवून सध्या प्राथमिक स्वरूपात उपाययोजना केल्या जातील. नवीन बांधकामाबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल असे खैरनार यांनी सांगितले. पुलासह अंतापूर ते मांगीतुंगी रस्ता फाटा तसेच द्वारकाधीश कारखाना मार्ग, हॉटेल सूर्या (विंचूर-प्रकाशा राजमार्गापर्यंत) रस्ता पक्क्या स्वरूपात करण्यात यावा, अशी मागणी अंतापूर येथील माजी उपसरपंच साहेबराव गवळी, सुनील गवळी, सुरेश गवळी, साहेबराव महाजन, बापू जाधव, अमृत गवळी, चंद्रकांत गवळी यांच्यासह आदिवासी बांधवांनी केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या