उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या वादाचे पडसाद सोमवारीही उमटले. येथील परिस्थिची नियंत्रणाबाहेर गेली असून तरुणाच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या जमावाने रुग्णालय, शोरूम, घर आणि पोलिसांची व्हॅन पेटवली आहे. जमावाचे रौद्ररुप पाहून पोलिसांनाही मागे हटावे लागले. परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून येथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हरदी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या महराजगंज येथे दुर्गामातेच्या विसर्जनावेळी डीजेवर गाणी वाजवण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. याच वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
यादरम्यान 22 वर्षीय रामगोपाल मिश्रा याचा मृत्यू झाला. त्याच्यावर चाकूने वार केल्याचे उघड झाल्यानंतर सोमवारी पाच ते सहा हजार लोकांचा जमाव त्याच्या घरी जमला. त्यानंतर संतप्त लोकांनी 5 किलोमीटरचा मोर्चा आणि अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले, मात्र जमावाने मागे हटण्यास नकार दिला. त्यानंतर जमावाने अचानक उग्र रुप धारण केले आणि जाळपोळ सुरू केली.
जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलीसही मागे हटले. संतप्त जमावाने गाड्या, रुग्णालय, शोरुम, घर, दुकानांना आग लावली. यामुळे पोलिसांची अधिकची कूमक मागवण्यात आली. पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित केले आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अब्दुल हमीद, सरफराज, फहीम, साहीर खान, ननकऊ आणि मारफ अलीसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केली आहे. अन्य चार जणांची ओळख पटलेली नाही. तर 30 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या प्रकरणी तातडीने बैठक बोलावली असून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.