बाहुबलीचा पहिल्याच दिवशी १०० कोटींचा खणखणाट

419

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ केवळ या एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बाहुबलीच्या चाहत्यांना तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली. देशभरात तब्बल ९ हजार स्क्रीनवर आज ‘बाहुबली-२’ तामीळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम अशा चार भाषांमध्ये झळकला. पहिल्याच दिवशी १०० कोटींची खणखणीत कमाई करत या चित्रपटाने प्रेक्षकांचा आणि स्वतःचा पैसा वसूल केला.
हिंदुस्थानातील चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला मच अवेटेड चित्रपट म्हणून ‘बाहुबली-२’कडे पाहिले जात होते. हॉलीवूडच्या तोडीचे स्पेशल इफेक्ट, रंजक कथानक आणि प्रभास, राणा यासारख्या कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे चाहत्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. देशभरातील बहुतेक चित्रपटगृहांमधली पहिल्या आठवड्य़ाची बुकिंग फुल्ल झाली असून हा चित्रपट साधारण एक हजार कोटींच्या घरात कमाई करील असे सिनेतज्ञ सांगतात.

फ्लॉप चित्रपटांमुळे झालेले नुकसान भरून निघेल
‘बाहुबली-२’ ला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सिंगल स्क्रीन थिएटरसाठी नक्कीच आशादायी चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी पहिल्या आठवड्य़ाची बुकिंग फुल्ल झाली आहे. ‘दंगल’नंतर बऱ्याच दिवसांनी ‘बाहुबली-२’ मुळे थिएटरबाहेर लांबलचक रांगा दिसत आहेत. मधल्या काळात फ्लॉप चित्रपटांमुळे झालेले सिंगल स्क्रीन थिएटरमालकांचे नुकसान हा चित्रपट नक्कीच भरून काढेल.
-नितीन दातार, अध्यक्ष, सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशन

शेवटची तीन तिकिटे मिळाली
‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या एका प्रश्नाच्या उत्तरासाठीच मला ‘बाहुबली- २’ मुलांसोबत बघायचा होता. परवाच मी ऑनलाइन बुकिंग केली आणि नेमकी शेवटची तीन तिकिटे मला मिळाली.
-निशा सोनवणे, प्रेक्षक

पुनःपुन्हा पाहायला आवडेल
‘बाहुबली’चा पहिला भाग मी टीव्हीवर पाहिला तेव्हापासून ‘बाहुबली-२’ पाहायचा तर थिएटरमध्येच ही गाठ मी मनाशी बांधली होती. हा चित्रपट मोठ्य़ा पडद्यावर पाहण्याचा अनुभव खूपच छान होता. चित्रपटातल्या व्हीएफएक्स इफेक्टस्ने तर अक्षरशः कमालच केली आहे.
-धनश्री शिंदे, प्रेक्षक

– २७० कोटी बजेटच्या या चित्रपटाने ओव्हरसिस आणि सॅटेलाइट हक्क यांच्या विक्रीतून आधीच ५०० कोटींची कमाई केली आहे.
– हैदराबादमध्ये तर ‘बाहुबली-२’ पाहण्यासाठी तीन कि.मी.च्या रांगा लागल्या होत्या.
– ‘बुक माय शो’वर रिलीजच्या आदल्या ‘बाहुबली-२’ची एका सेकंदाला सरासरी १२ तिकिटांची विक्री झाली आहे. ‘बाहुबली-१’च्या तुलनेत ‘बाहुबली-२’च्या ऍडव्हान्स बुकिंगचे प्रमाण ३५० टक्क्यांहून अधिक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या