बैलपोळा! अतूट भावनिक नातं

जे. डी. पराडकर,[email protected]

उद्या पिठोरी अमावास्या… अर्थात बैलपोळा… आपल्या कृषीव्यवस्थेचा पाया वृषभ राजा. त्याच्या अफाट मेहनतीवर साऱया देशाची कृषीव्यवस्था आणि पर्यायाने अर्थव्यवस्था अवलंबून असते… या निमित्ताने पाहूया वृषभराजाची आपल्या मालकाप्रती असलेली निष्ठा… शेतातली ‘ढोर’ मेहनत…

शेती, शेतकरी आणि वृषभराजा… आपल्या कृषी व्यवस्थेचा… अर्थव्यवस्थेचा… दाण्यापाण्याचा… सगळ्या जगण्याचाच कणा… आपल्या कृषीप्रधान देशाचं जीवनमान संपूर्णतः या शेतीवर अवलंबून… शेती शेतकऱयाच्या हातात.. आणि बळीराजाची सगळी मेहनत त्याच्या खिल्लारी बैलजोडीवर… आजही आपल्या महाराष्ट्राचा बळीराजा… त्याची शेती बैलांवरच अवलंबून आहे. शेतात भात लावणारे, दाणे पेरणारे हात जरी शेतकऱयाचे असले तरी जमिनीची नांगरणी करणारी मेहनत वृषभ राजाची असते. भातशेती आणि कोकण यांचे खूप जवळचे नाते मानले जाते. कोकणातील शेतकरी मनाने समृद्ध आणि वृत्तीने समाधानी असतो. विशेष म्हणजे या शेतकऱयाच्या खांद्याला खांदा लावून त्याचे संपूर्ण कुटुंब शेतीत राबत असते.

jd-11

शेतकरी ही व्यक्तीच अशी आहे की, त्याचे जेवढे मुलाबाळांवर आणि कुटुंबावर प्रेम असते तेवढेच शेतीसाठी राबणाऱया बैलांवरही असते. वरुणराजा, बळीराजा आणि वृषभराजा या त्रिसुत्रीवरच शेतीचे सारे गणित अवलंबून असते. शेतकरी आणि बैल यांचे एक अतूट आणि भावनिक नाते निर्माण होते. हे नाते एवढे घट्ट होते की, वृषभराजा कुटुंबातील सदस्यच बनून जातो. बैलपोळा असो अथवा देवदिवाळी, या सणांदरम्यान शेतकरी कृतज्ञ भावनेने या मुक्या जनावरांपुढे नतमस्तक होतो.
कोकणात अजूनही शेतीचा मुख्य सूत्रधार वृषभराजाच आहे. येथील पशुपालनावर फारसा परिणाम झालेला नसल्याने येथील शेती यंत्राद्वारे नव्हे, तर बैलांच्या कष्टावरच होते. त्यांच्या कष्टाप्रति उतराई होण्याचे दोन उत्सव राज्यात सर्वत्र साजरे केले जातात. यामध्ये बैलपोळा आणि देवदिवाळी या मुख्य सणांचा समावेश आहे.

बैलपोळा महाराष्ट्रात मोठय़ा उत्साहाने तर देवदिवाळी हा सण कोकणात मोठय़ा भक्तिभावाने संपन्न होतो. सध्या भातशेती फुलोऱयाला येण्याच्या स्थितीत असताना शेतकरी आनंदी आहे. कोकणच्या रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील शिवणे सनगरे वाडीत वास्तव्याला असणाऱया विलास आणि पूनम सनगरे या शेतकरी कुटुंबाजवळ बातचीत करताना शेतकऱयाच्या पशुपालनाचे आणि विशेषतः त्यांच्या बैलांवर असणाऱया कृतज्ञतेचे अनेक पैलू समोर आले. विलास सनगरे यांचे शिक्षण नववीपर्यंत, तर त्यांची शेतकरी पत्नी पूनम यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. शेती करताना सामाजिक कार्याची आवड असल्याने पूनम या शिवणे गावच्या सरपंचपदी विराजमान असून गेले वर्षभर त्या शेतीच्या विविध कामांसोबत गावचे समाजकारणदेखील पाहत आहेत.

टिक्या आणि बाळ्या

शेतकरी असणाऱया पूनम गावच्या सरपंच असल्या तरी दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत बैल कवळठय़ात चरायला न्यायची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. ग्रामपंचायत बैठका अथवा अन्य कामाच्या वेळी बैलांना चरायला न्यायचे काम पती विलास करतात. साधारण 12 वर्षांपूर्वी विलास यांनी त्यांच्याकडे असणारे दोन बैल, त्यातील ‘बाळ्या’ कोळंब्यातून, तर ‘टिक्या’ हा बैल आंबवली येथून आणला. आंबवली हे पूनम यांचे माहेर असल्याने त्यांचे टिक्यावर थोडे अधिक प्रेम आहे. टिक्या हा बैल आंबवलीतून आणल्यानंतर त्याचे मूळ मालकावर एवढे प्रेम होते की, चरायला सोडल्यानंतर तो नजर चुकवून एकूण तीन वेळा आंबवलीत परत गेला होता असे विलास सनगरे यांनी सांगितले. मात्र तीनही वेळा मूळ मालकाने आपल्याजवळ संपर्क करून टिक्या आमच्याकडे आल्याचे कळविल्याने आम्ही त्याला परत घेऊन आलो. मात्र त्यानंतर आम्हीही टिक्याला एवढे प्रेम दिले की, तो परत कधीही आमची नजर चुकवून आपल्या मूळ मालकाकडे गेला नाही असे विलास यांनी अगदी डोळ्यांत पाणी आणून सांगितले. मुके प्राणी त्यांच्यावर माया केली की, ती कधीही विसरत नाहीत हाच प्रत्यय या प्रसंगातून आल्याचे दिसून येते. बाळ्या हा रंगाने काळा असल्यामुळे तो बाळ्या झाला आणि टिक्याचे नाव त्याच्या आधीच्या मालकाने ठेवले तेच ठेवले असेही पुढे ते सांगतात.

‘टिक्या’ आणि ‘बाळ्या’ यांना चरायला घेऊन गेल्यानंतर अनेकदा जवळपास येऊन बिबटय़ाने डरकाळ्या फोडल्याचे पूनम यांनी नमूद केले. पूनम यांच्या माहेरीही बैल आणि अन्य गुरे असल्याने त्यांनाही लहानपणापासून गुरे चरायला न्यायची तसेच शेतीची आवड आहे.

शेतीची आणि बैलांची कामे

रोहिणी नक्षत्र लागल्यावर पेरणीला सुरुवात होते. पेरणीनंतर बरोबर एकवीस दिवसानंतर रोपं लागवडीयोग्य मोठी होतात. त्याच्यानंतर लावणीचा हंगाम सुरु होतो. हा हंगाम शेतीच्या व्याप्तीनुसार आणि पावसाच्या साथीनुसार पंधरा ते वीस दिवस चालू असतो. मे महिन्यात जेव्हा पेरणी केली जाते तेव्हा बैल लागतातच आणि रोपं वाढल्यावर जेव्हा एकवीस दिवसाने लावणी सुरु होते तेव्हा परत पंधरा ते वीस दिवस काम चालू असते, तेव्हाही बैलाची कामं सुरुच असतात. या दोन्ही वेळा बळीराजाच्या सोबतीला बैलच असतो. एखाद्या वेळी बैल काम करत असताना थांबला असेल तर काय रे पाणी हवंय का? भूक लागली काय अशा प्रकारचे संवाद शेतकरी त्यांच्यासोबत साधत असतात. आणि मग अशावेळी बैल थकला किंवा तो पुढे जात नाही असे वाटले तर मग त्यांना थोडी विश्रांती देऊन पाणी, चारा दिला जातो. पावसाळ्यात हिरवा चारा असतो तो गार असतो. त्यामुळे त्यांना उष्णता मिळावी म्हणून पेंढा दिला जातो. त्यामुळे त्यांच्या शरीरात थोडी उष्णता निर्माण होते.

संध्याकाळी त्यांची सेवा..

बैलांना चिखल लागलेला असल्याने संध्याकाळी घरी परतताना शेताजवळ जिथे ओढा लागेल तिथे आंघोळ घातली जाते. नंतर परत घरी गेल्यावर त्यांच्या अंगाला तेल लावले जाते आणि तेल लावून पुन्हा गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. कारण दिवसभर चालल्याने चिखलात पाय गेल्याने शरीर थकलेले असते. असे जितके दिवस लावणीचे काम असते तितके दिवस त्यांना अशी आंघोळ घातली जाते.

रब्बी हंगाम

शेती कापणीनंतर बैलांना थोडी विश्रांती असते. पण हल्ली कोकणातला शेतकरी रब्बी पिकांकडे वळला आहे. जेव्हा भातकापणी पूर्ण होते आणि जेव्हा कोकणात थंडीचा हंगाम सुरु होतो त्यावेळेला सकाळच्या दवावर शेती रिकामी राहू नये म्हणून एक पर्यायी पिक म्हणून कुळीथ आणि पावटय़ाची लागवड करतात. त्यावेळेला परत शेताची नांगरणी करावी लागते. कारण भातकापणी केल्यावर त्याचा काही अंश खाली शिल्लक राहतो. त्याच्यासाठी परत ती सगळी नांगरणी करण्यासाठी परत एक बैलांना आठ दिवसाचे काम लागते. साधारण भात कापणीच्या पंधरा ते वीस दिवसांनी रब्बी हंगामात कडधान्य लागवडीसाठी लागतो त्यानंतर बैलांना विश्रांती असते.

भावनिक नातं

हे बैल त्यांच्यासाठी कुटुंबातील सदस्यच असतात. हाक मारल्यावर एक वेळेस माणूस मागे वळून पाहणार नाही पण शेतकऱयाने त्याच्या या मुक्या जनावराला नावाने हाक मारली आणि थांब म्हटलं तर ते जागच्या जागी उभे राहते. काही वेळा त्याच्या मनात काय आहे हे शेतकऱयाला सहज ओळखता येते. कारण हा जो मुका जीव आहे तो त्याच्याशी अतिशय एकनिष्ठ असतो. त्या दोघांची स्वतःची एक भाषा असते या भाषेतूनच बैलाचे शेतकऱयाशी आणि त्याच्या कुटुंबाशी भावनिक नाते जोडले गेले असते.

बैलपोळा आणि देवदिवाळी

भातशेती असल्यामुळे त्याचा पेंढा बैलांसाठी वैरण म्हणून उपयोगी पडतो तर पावसाळ्यात हिरवा चारा आणि दिवाळीनंतर डोंगरउतारावर उपलब्ध असलेले मुबलक गवत वैरणीसाठी वापरण्यात येते. बैलपोळा आणि देवदिवाळी फक्त कोकणात साजरी करून शेतकरी वृषभराजापुढे नतमस्तक होतो. या दोन्ही सणांप्रसंगी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही. देवदिवाळीला बैलांची शिंगे रंगवली जातात. तेल लावून त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालून उटणे लावले जाते. शेंदूर लावून त्यांच्या अंगावर झुल टाकतात. बैलांना दिवा दाखवून त्यांना ओवाळण्यात येते. घावन तसेच अन्य गोड पदार्थ त्यांना खायला घातले जातात. याप्रसंगी शेतकरी नांगरही स्वच्छ धुऊन त्याचे पूजन करतो असे विलास सनगरे यांनी नमूद केले. बैल पोळ्याच्या प्रसंगी बैलांना गरम पाण्याची आंघोळ, ओवाळणे, गोड पदार्थ आदी विधी आणि प्रकार साजरे करतो असे सांगून सनगरे म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण मुलांची नावे ठेवतो त्याप्रमाणे मुक्या जनावरांची त्यांच्या रंगावरून, शिंगावरून अथवा अन्य काही लकबीवरून नावे ठेवली जातात. आपण ठेवलेले नाव त्यांच्या एवढे अंगवळणी पडते की, त्या नावाने हाक मारल्यानंतर मुके जनावर थांबले नाही असे होत नाही. असा अनुभव आपल्याला टिक्या आणि बाळ्याच्या बाबतीत येत असल्याचे विलास आणि पूनम यांनी सांगितले.

कृतज्ञता हा आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा पाया आहे. बाळ्या आणि टिक्यासारख्या इमानी, निष्ठावान आणि प्रेमळ बैलजोडय़ा महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या घरोघरी आढळतात. उद्याच्या बैलपोळ्यानिमित्त या वृषभराजाला मनापासून सलाम… आणि खूप खूप प्रेम.

आपली प्रतिक्रिया द्या