मॅटियो पेलिकोन कुस्ती मानांकन स्पर्धा, बजरंग पुनियाने सुवर्णपदक राखले

हिंदुस्थानच्या बजरंग पुनियाने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना मॅटियो पेलिकोन कुस्ती मानांकन स्पर्धेत सलग दुसऱया वर्षी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. 65 किलो गटाच्या अंतिम लढतीत यावेळी त्याने मंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओचिरवर रोमहर्षक विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. बजरंगने गतवर्षी अमेरिकेच्या जॉर्डन ओलिवरचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले होते.

यावेळी बजरंग पुनियाचा सुवर्णपदकाच्या लढतीत चांगलाच घामटा निघाला. तोडीसतोड झालेल्या या कुस्तीत तुल्गा तुमूर 2 गुणांची कमाई करून आघाडीवर होता. मात्र, बजरंग पुनियाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून अखेरच्या 30 सेकंदांत 2 गुणांची कमाई केली. लढतीत 2-2 अशी बरोबरी साधली. बरोबरीच्या लढतीत अखेरचा गुण मिळविल्यामुळे नियमानुसार बजरंग पुनिया सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. बजरंगने उपांत्य लढतीत अमेरिकेच्या जोसफ ख्रिस्टोफरचा 6-3 गुणांनी पाडाव करून अंतिम फेरी गाठली होती.

पुन्हा अव्वल

या स्पर्धेपूर्वी बजरंग पुनिया आपल्या वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर होता. मात्र, या स्पर्धेत 14 गुणांची कमाई केल्याने त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले. नवीन क्रमवारी या स्पर्धेच्या निकालावरच अवलंबून होती. त्यामुळे सुवर्णपदक जिंकताच बजरंग ‘नंबर वन’च्या सिंहासनावरही विराजमान झाला.

कालीरमनला कांस्य; नरसिंगला अपयश

हिंदुस्थानच्या विशाल कालीरमनने ऑलिम्पिकमध्ये समावेश नसलेल्या 70 किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कझाकिस्तानच्या सिर्बझ तलगटचा 5-1 गुण फरकाने पराभव केला. मात्र, दुसरीकडे 74 किलो गटातील कांस्यपदकाच्या लढतीत नरसिंग यादवचा पराभव झाला. त्याला कझाकिस्तानच्या दनियार कॅसानोवने 5-0 गुण फरकाने हरविले. डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर पुनरागमन केलेल्या या महाराष्ट्राच्या कुस्तीपटूने काही प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. मात्र, पदकाने त्याला हुलकावणी दिली.

चार कुस्तीपटूंनी मिळविला ऑलिम्पिक कोटा

हिंदुस्थानला टोकियो ऑलिम्पिकसाठी चार कुस्तीपटूंनी कोटा मिळवून दिला. सुवर्णपदक विजेत्या बजरंग पुनियाने याआधीच ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे. याचबरोबर दीपक पुनिया व रवी दहिया यांनीही आपापल्या गटातून आधीच ऑलिम्पिक कोटा मिळवून दिलेला आहे. विनेश फोगाटही हिंदुस्थानला ऑलिम्पिक कोटा मिळवून देणारी एकमेव महिला कुस्तीपटू ठरली आहे.

हिंदुस्थानी कुस्तीपटूंना टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्यासाठी अजून दोन संधी आहेत. याच वर्षी कझाकिस्तानमध्ये 9 ते 11 एप्रिलदरम्यान आशियाई पात्रता स्पर्धा, तर 6 ते 9 मे या कालावधीत बुल्गारियामध्ये जागतिक पात्रता स्पर्धा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या