आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ’बकरू’ आणि ’आरंभ’ची बाजी!

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन आणि मेगा रिक्रेयशनतर्फे नुकतेच प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ‘बकरू’ आणि ‘आरंभ’ हे लघुपट सर्वोत्कृष्ट ठरले. ‘धडा’ या लघुपटासाठी संजय खापरे सर्वोत्कृष्ट अभिनेते तर ‘फ्रेंच फ्राईज’ या लघुपटासाठी कल्पना राणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या.

आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात अनुप ढेकणे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बकरू),  महेंद्र पाटील (सर्वोत्कृष्ट कथा – आरंभ), मनिष मेहेर ( सर्वोत्कृष्ट पटकथा – नझरिया), हासिम नागराल( सर्वोत्कृष्ट संवाद – मेरी सायकल), अविनाश लोहार (सर्वोत्कृष्ट छायांकन – धडा) , श्रीनिवास एन. जी. ( सर्वोत्कृष्ट संकलक – बकरू), सुदेश मिसाळ (सर्वोत्कृष्ट बालकलाकार – पान) यांना सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक तथा उपसचिव संतोष रोकडे, अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आर्यन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सरवणकर, सांडवे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

तिसऱया आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात यंदा बहुभाषिक लघुपटांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी निवडक लघुपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले. लवकरच मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा’’ सुरू करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.