नकोशी मात्र त्यांना हवीहवीशी

94

अलका स्वामी 

चार भिंती, डोक्यावर छप्पर म्हणजे खोली तयार होते, पण त्या खोलीत माणसांचा वावर सुरू झाला की, ते ‘घर’ होते. त्या घरात इवलाली पावले दुडूदुडू नाचू लागली, बालहट्ट करू लागली की, त्या घराचे गोकुळ होते. वरळीतील ‘बाल आशा ट्रस्ट’नामक संस्थेत असेच एक गोकुळ आहे. लहानग्या जीवांना मायेची ऊब देणारे हे गोकुळ. या संस्थेला नुकतेच अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच!

वरळी भागात दक्षिण मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या गाड्यांचा एवढा आवाज असतो की, कुठल्या घरात रडणाऱ्या मुलाचे म्हणणे आपल्या कानी पडणे कठीणच. याच रस्त्यावर ‘बाल आशा ट्रस्ट’ या संस्थेची बैठी इमारत आहे. इथे एक-दोन नव्हे तर तब्बल ४५ लहान मुले एकाच वेळी ‘सूर’ लावतात. प्रत्येकाची आर्त हाक त्याच्या माता-पित्याला शोधत असते. कुणी भूक लागली म्हणून, तर कुणी आईची आठवण आली म्हणून. कोण आहेत ही निरागस बालके? समाजाने टाकून दिलेली, नाकारलेली ही मुले आहेत. ही मुले सरकारमार्फत या ट्रस्टकडे येतात आणि दत्तक विधानाचे सोपस्कार आटपेपर्यंत हा ट्रस्ट त्यांचे घर बनते. इथे त्यांना अपार माया, खूप प्रेम मिळते. गेली ३२ वर्षे सुरू असलेला ‘बाल आशा ट्रस्ट’चा हा मायेचा यज्ञ अखंड धगधगतोच आहे.

सुनील अरोरा हे या ट्रस्टचे प्रमुख आहेत. १९८९ मध्ये या ट्रस्टची स्थापना झाली. तसे अरोरा वयाच्या बाराव्या वर्षापासून या ट्रस्टशी जोडले गेले आहेत. आईबरोबर या जागेत ते यायचे आणि काम करायचे. नंतर नंतर कळू लागले तेव्हा त्यांनी निर्धार केला आणि या लहान मुलांसाठी आई-वडील अशा दोन्ही भूमिका करण्याचा निर्धार केला. त्यातूनच ‘बाल आशा ट्रस्ट’चा अंकुर रुजला आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

आतापर्यंत तब्बल १२०० मुलांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचे काम ट्रस्टने केले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक मुलाची मायेने काळजी घेतली जाते. केवळ ‘सांभाळ करणारी दाई’ एवढीच इथल्या कर्मचाऱ्यांची भूमिका नसते, तर एका निरागस आणि अश्राप जीवाला भरपूर प्रेम देण्याची त्यामागे भावना असते. या मुलांना जेवण देणे, त्यांच्या शारीरिक व्याधींवर इलाज करणे आणि मुख्य म्हणजे प्रेमासाठी आसुसलेल्या या लहानग्यांवर मायेची पाखर घालणे असे काम येथील कर्मचारी करतात.

ही मुले ट्रस्टकडे सरकारकडून येतात. कुणीतरी आर्थिक हलाखीमुळे वा नकोशी झाली म्हणून रस्त्यावर सोडतात. सरकार अशा मुलांना ट्रस्टच्या हवाली करते. मग दत्तक विधान कोर्टाच्या निर्णयानुसार सुरू होते. वर्तमानपत्र – टीव्हीवर जाहिराती, बातम्या दिल्या जातात. ‘या मुलांचे पालक कोण’ अशी विचारणा केली जाते. फोटो पाहून कुणी आई-वडील पुढे आले तर ओळख पटवून कोर्टाचा आदेश घेऊन मूल त्यांच्या हवाली केले जाते.

ज्या मुलांना दत्तक द्यावयाचे आहे त्यांची सर्व माहिती सरकारी वेबसाईटवर टाकली जाते. तिथेच ऑनलाइन अर्ज करून कुठल्याही तीन राज्यांतील तीन मुले निवडावी लागतात. त्या दांपत्याने आपली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक माहिती भरणे आवश्यक असते. त्यानंतरच मूल दत्तक दिले जाते. मूल दत्तक दिल्यानंतरही ‘त्या’ घरात मुलाची आबाळ होत नाही ना याची पाहणी करण्यासाठी ट्रस्टचे कर्मचारी कधीही ‘त्या’ घरात धडकतात. ही सगळीच प्रक्रिया किचकट असली तरी या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सुनील अरोरा सांगतात.

वैशाली भक्ते ही तरुणी येथे समाजसेविका म्हणून काम करते. नोकरी म्हणून या कामाकडे ती बघत नाही, तर एका अनाथ मुलाला आपल्यामुळे मायेची पाखर मिळते आहे, वैशालीसारखाच इथे १०-१२  जणांचा कर्मचारीवर्ग आहे. त्यांचीही कामाप्रती अशीच भावना आहे. सध्या या ट्रस्टकडे सर्वात लहान मूल आहे ते अवघ्या १५ दिवसांचे. जास्तीत जास्त वयाच्या १२ वर्षापर्यंत मुलाला येथे ठेवले जाते. तोपर्यंत कुणी त्यांना दत्तक घेतले तर उत्तमच, नाहीतर मग त्यांची  रवानगी सरकारी बालआश्रमात केली जाते.

समाजाला नकोशी झालेली मुले ‘बाल आशा ट्रस्ट’ला मात्र हवीहवीशी आहेत. संस्थेच्या या अतुलनीय योगदानाबद्दल नुकताच सरकारतर्फे संस्थेला अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुलांना घर मिळायलाच हवे असे अरोरा यांचे म्हणणे आहे. प्रत्येकाला आपण आनंदात असावे असे वाटणे हा मुनष्यस्वभाव झाला आणि आपल्यासारखे इतरांनीही आनंदात असावे असे वाटणे ही माणुसकी झाली. वरळीतील बाल आशा ट्रस्ट अशी माणुसकी जपण्याचे काम गेली ३२ वर्षे करीत आहे आणि करीतच राहणार आहे, एखाद्या वटवृक्षासारखे!

आम्ही एक सेवा म्हणून हे क्रत स्वीकारले आहे. या मुलांना घर मिळावे, ते सुजाण नागरिक बनावेत यासाठी समाजानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुणाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हे कठीण काम असते. तेच काम आम्ही करीत आहोत. – सुनील अरोरा, विश्वस्त

या अनाथ मुलांकडे ‘नकोशी’ या नजरेतून पाहू नका एवढीच समाजाकडून अपेक्षा आहे. या मुलांना प्रेम, माया हवी आहे, करुणा नको. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. – वैशाली भक्ते, समाजसेविका

आपली प्रतिक्रिया द्या