‘बाळ भीमराव’चे संभाजीनगरात आकर्षण

178

दिवाकर शेजवळ । मुंबई

मराठवाडा विद्यापीठाला ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन करण्यात आलेल्या नामविस्ताराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोमवारी (14 जानेवारी) राज्यभरात साजरा होत आहे. त्यानिमित्त संभाजीनगर येथील त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला अभिवादन करण्यासाठी सालाबादाप्रमाणे हजारो आंबेडकरी बांधव राज्यभरातून जाणार आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षमय बालपण चित्रित केलेल्या ‘बाळ भीमराव’ या चित्रपटातील नायक मास्टर मनीष कांबळे हा बाल अभिनेता यंदाच्या नामविस्तार दिनी आकर्षक ठरणार आहे.

संभाजीनगरात नामविस्तार दिनानिमित्त विविध पक्ष-संघटनांतर्फे नामांतर लढय़ातील भीम शहिदांना जाहीर सभांतून अभिवादन केले जाते. त्या सभांमध्ये नामवंत नेत्यांच्या हस्ते मनीष कांबळे याचा सत्कार आणि ‘बाळ भीमराव’ या चित्रपटाच्या पोस्टर्स बॅनर्सचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

‘बाळ भीमराव’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी 18 जानेवारीपासून संभाजीनगर येथील ‘अंबा-अप्सरा’ या टॉकीजमध्ये प्रदर्शित होत आहे. नामविस्तार दिनानिमित्त बाल अभिनेता मास्टर मनीष कांबळेसह त्या चित्रपटातील कलावंतांचा चमू गुरुवारीच मराठवाडय़ात दाखल झाला आहे. त्यातील कलावंतांनी मराठवाडय़ातील अनेक दलित नेते आणि आंबेडकरी वस्त्यांना भेटी दिल्या आहेत. त्यावेळी ‘बाळ भीमराव’ची भूमिका साकारलेल्या मनीष कांबळे याचे उत्स्फूर्त स्वागत झाले, असे त्या चित्रपटाचे एक निर्माते अनिल अहिरे यांनी दैनिक ‘सामना’ला सांगितले.

त्या चित्रपटाची निर्मिती अनिल अहिरे आणि ‘भीमराज की बेटी’ फेम प्रसिद्ध गायिका निशा भगत यांनी केली आहे. त्यात विक्रम गोखले, मोहन जोशी, किशोरी शहाणे, धनंजय मांदरेकर, प्रेमा किरण, निशा भगत, मधुसुदन पेडणेकर, तुळशीदास कदम, रवींद्र खंडागळे, प्रतिभा शिंपी आणि मास्टर मनीष कांबळे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

प्रकाश नारायण जाधव आणि अमर पारखे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गीते प्रतापसिंग बोदडे, मंगेश सरदार, राजानंद गडपायले, हिरामण गायकवाड, अशोक खोळंबे यांची आहेत. तर ती गीते सुरेश वाडकर, शंकर महादेवन, निशा भगत, अरविंदर सिंग, आशालता भगत, अश्विनी कांबळे यांनी गायली आहेत. शंकर कांबळे हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत.

विदर्भात दीड महिना धूम
ममराठवाडय़ाआधी ‘बाळ भीमराव’ हा चित्रपट विदर्भात 9 मार्च 2018 रोजी प्रदर्शित झाला. तिथे तो दीड महिना चालला. नंतर मे महिन्यात पुणे, लोणावळा, कर्जत, बदलापूर, उल्हासनगर येथील चित्रपटगृहात हा चित्रपट दोन आठवडे चालला.

‘बाळ भीमराव’ या चित्रपटाची निर्मिती आम्ही कोणीही फायनान्सर पाठीशी नसताना स्वतःच्या कमाईच्या पैशातून केली. अवघ्या 14 दिवसांत चित्रीकरण पूर्ण झाले. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे.
– अनील अहिरे, निर्माता, ‘बाळ भीमराव’ चित्रपट

आपली प्रतिक्रिया द्या