बालगृहातील सावळागोंधळ! आश्रमशाळेत शिकणाऱ्या, पालकांच्या ताब्यात दिलेल्या, खोट्या नावांच्या मुलांचीही उपस्थिती

34

बाबासाहेब गायकवाड । नाशिक

आदिवासी आश्रमशाळेत शिकणारी मुले, पालकांच्या ताब्यात दिलेली, प्रवेशास अपात्र ठरविलेली आणि खोटी नावे व पत्ते असलेली असंख्य मुले नाशिक जिह्यातील बालगृहांच्या रेकॉर्डवर दाखविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित संस्थाचालक, शासनाच्या महिला बालविकास विभागातील संबंधित अधिकारी आणि प्रवेश प्रक्रियेत महत्वाचा दुवा ठरणारी महिला बालकल्याण समिती या टोळीने शासनाची दिशाभूल करून वर्षानुवर्षे अनुदानाच्या माध्यमातून लाखो रुपये लाटल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

नाशिक जिह्यात अनाथ मुलांसाठी महिला व बालविकासचे एकूण १८ बालगृह आहेत. अनाथांच्या नावाने स्वतःची तुंबडी भरणारी टोळी अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे लेखापरिक्षण अहवालातून उघड झाले आहे. मागील वर्षाच्या उपस्थितीवर चालू वर्षासाठी संबंधित संस्था अनुदान मागत असते. त्यांनी दिलेल्या रेकॉर्डची कुठलीही खात्री न करता बिनबोभाटपणे अनुदानाची खिरापत लाटली जात आहे, हेही स्पष्ट झाले आहे.

अपात्र व पालकांच्या ताब्यात दिलेली बालके

कळवण तालुक्यातील मानूर येथे आझाद हिंद एज्युकेशन धुळे संचलित या संस्थेचे भावना बालगृह व बालसदन आहे, तेथील ललीत मोहन शेवाळे, संदीप राजेंद्र बागुल, रोशन राजेंद्र बागुल, ऋषिकेश कारभारी शिंदे, मयूर कारभारी शिंदे, भूषण उत्तम शिंदे, संदीप अशोक सोनवणे, आकाश मुरलीधर पवार, नीलेश आप्पाजी शेवाळे, विवेक विलास महाले, मंदार विलास महाले, मयूर वसंत पवार, शशी बाबुलाल गांगुर्डे, समाधान अनिल खैरे, नितीन काळू वरडे, निवृत्ती दत्ता सोनावळे यापैकी नऊ विद्यार्थ्यांना बालकल्याण समितीने गृहभेटीनुसार अपात्र ठरविले होते. तरीही त्यांची खोटी उपस्थिती दाखविण्यात आली. यातीलच बारा बालके ३१ मे२०१६ रोजी पालकांच्या ताब्यात दिल्याबाबतचे आदेश देण्यात आलेले होते, त्यांचे प्रवेश कमी करणे आवश्यक असतानाही त्यांचीही पूर्ण वर्षाची उपस्थिती दाखविण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील कै. भिकाकाका बालकाश्रमातही हीच तऱहा आहे, येथील योगेश परसराम बोरसे, उमेश रमेश बागुल, तुषार रामनाथ गायकवाड, सतिष शंकर वडजे, प्रवीण वाळू गायकवाड, सागर मोतीराम गायकवाड, अजय पंडित राऊत हे सात विद्यार्थी अपात्र ठरविण्यात आलेले असतानाही त्यांची उपस्थिती दाखविण्यात आली आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थी

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील ममता बालगृहातील झिपरू काशीराम जगताप रा. बंधारपाडा, ता. कळवण हा खर्डेदिगर येथे नववीत, प्रेमदास रामचंद्र भोये हा दिंडोरीतील उंबरखेड येथे चौथीत, युवराज रमेश पवार हा कळवणच्या दळवट येथे सातवीत, पवळू काशीराम जगताप हा गणोरे येथे, दिंडोरी तालुक्यातील वणी येथील कै. भिका काका बालकाश्रमातील रोशन सुरेश चौरे हा पारेगाव येथे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकत असल्याचे गृहभेटी अहवालात समोर आले. असे असतानाही या सर्वांच्या नावावर अनुदान घेतले आहे.

बनावट नावे, पत्ते

कळवणच्या मानूर येथील भावना बालगृहातील संदीप अशोक सोनवणे, सुनील दगडू शेलार, गणेश विष्णू सूर्यवंशी, शुभम अरुण अहिरे, सोनी बुध माळी, ललित मोहन शेवाळे, अक्षय यादव चौधरी, प्रवीण वाळू गायकवाड, हार्दिक हिरामण भुसार, देवेंद्र विष्णू गायकवाड, अमोल मोहन गायकवाड, भास्कर मोहन गायकवाड, अजय पंडित राऊत, चेतन शांताराम राऊत, नरेंद्र दिनकर भोये या मुलांचे गृहभेटीच्या अहवालानुसार पत्ते व नावे सिद्ध होवू शकले नाही. असे असतानाही बालकल्याण समितीने कागदोपत्री हे प्रवेश दिलेच कसे व महिला व बालविकास विभागाने ते मान्य करून त्यांच्या नावे अनुदान दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या