बाला – केसांच्या केसची गंमतीदार केसस्टडी

2763

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

आयुषमान खुराना ज्या सिनेमात काम करतो त्या सिनेमांना अखंड आयुष्यमान भव असा आशीर्वाद मिळतो यात काही खोटं नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाला’ सिनेमाने पुन्हा एकदा त्याची ही जादू पडद्यावर आणली आहे. दिवाळीनंतर काही तरी खमंग आणि तरीही हलकाफुलका आनंद या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यांना मिळेल यात शंका नाही.

लहानपणी भरगच्च जावळ असणाऱया बाळाचं नाव आई-बाबा अगदी कौतुकाने बाला ठेवतात. शाळेत असताना रुबाबदार, जुल्फेदार केसांमुळे तो शाळेचा हीरो असतो. पण अचानक वयाच्या पंचविशीच्या सुमारास त्याच्या डोक्यावरचे केस झडायला लागतात आणि अकाली टकलेपणाला त्याला सामोरं जावं लागतं. अचानक आलेल्या केस झडतीमुळे त्याला अकाली नैराश्य येतं. जे जो सांगेल ते उपाय करता करता नाकीनऊ येतात, पण त्याचे केस गळती सत्र थांबतच नाही. दरम्यान त्याच्या आयुष्यात त्याच्या स्वप्नातली परी येते आणि तिच्यासमोर सुरू होतो लपंडाव. मग या प्रेम कहाणीचं होतं काय? लपवा छपवीमध्ये खरं कधी बाहेर येतं? मग काय होतं? टकलेपणावर शेवटी काय उपाय सापडतो? या सगळय़ांची गमतीदार गोष्ट म्हणजे ‘बाला’ हा सिनेमा.

या सिनेमाचं सगळय़ात मोठं वैशिष्टय़ म्हणजे विषय मांडणीतून उभी केलेली सहजता. अकाली टक्कल हा प्रश्न अनेकांना त्रास देत असेल, पण या प्रश्नाकडे ती व्यक्ती आणि आजूबाजूचे ज्या पद्धतीने बघतील त्याच पद्धतीने दिग्दर्शकाने हा सिनेमा हाताळला आहे आणि त्यामुळे तो खूप खरा वाटतो. म्हणजे हा सिनेमा विनोदी असून प्रासंगिक विनोद खच्चून भरले असूनदेखील त्यात अनावश्यक अतिशयोक्ती विनोद नाहीत. अगदी साध्या प्रसंगांमधून अगदी सहज विनोदी दृश्ये निर्माण झाली आहेत. त्यात बालाचं अभिनय कौशल्य, विविध सुपरस्टार हीरो साकारताना त्याला मिळणाऱया टाळय़ा आणि त्याचवेळी त्याच्या टकलामुळे आतमध्ये होणारी घुसमट खूप अप्रतिम दाखवली आहे.

इन्स्टाग्रामवरचे फोटोशॉप केलेले फोटो, टिक-टॉक व्हिडीओची फॅशन आणि तरुण पिढीला अगदी चटकन हवं असणारं फेम आणि बाह्य जगाचं आकर्षण अगदी मस्त दाखवलं आहे. आजचं हे खरं जग या सिनेमात पाहत असताना त्यातलं व्यंग अधिक प्रखरतेने जाणवतं.

आयुषमान खुरानाची अभिनायच्या बाबतीत असलेली जाण आजवर त्याच्या प्रत्येक सिनेमातून अनुभवायला आली आहे. या सिनेमात तो आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे असं म्हणावं लागेल. त्याच्या दिलखुलास सहज अभिनयाने सिनेमा अधिक रंगला आहे हेच खरं. भूमी पेडणेकर या गुणी अभिनेत्रीची साथदेखील तितकीच खमकी. आपण बॉलीवूडच्या हिरोईन असण्यापेक्षा एक अभिनेत्री आहोत हे तिला खूप चांगलं उमगलं आहे आणि त्यामुळेच चांगल्या अभिनयाचा आनंद आपल्या वाटय़ाला येतो. यामी गौतमची साथदेखील तितकीच छान. बाकीचे सगळे कलाकार भूमिकेची गरज जाणून उत्तम वावरले आहेत.

सिनेमाची गाणी, लखनवी वातावरण, संवाद या सगळय़ाच गोष्टी सिनेमाला परिपूर्ण करतात. सिनेमाचा शेवटदेखील उगाच ठिगळ न जोडता खरा केला आहे हे विशेष. एकूणच सगळय़ाच गोष्टी संतुलितपणे जुळून आल्या की एक उत्तम सिनेमा वाटय़ाला येऊ शकतो. त्यासाठी ग्लॅमर, बिग बजेट, सुपरस्टार या कशाची गरजही वाटत नाही आणि बाला बघताना हाच आनंद वाटय़ाला येतो.

सिनेमा बाला
निर्माता दिनेश विजन
दिग्दर्शक अमर कौशिक
लेखक निरेन भट्ट
संगीत सचिन-जिगर, जानी, बी. प्राक
कलाकार आयुषमान खुराना, भूमी पेडणेकर, यामी गौतम, जावेद जाफरी.

आपली प्रतिक्रिया द्या