बालाजी, रामदेवबाबा विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता

11

सामना ऑनलाईन,मुंबई

पुण्यातील श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस तसेच नागपूर येथील रामदेवबाबा युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून ही दोन्ही विद्यापीठे सुरू होतील. या दोन्ही विद्यापीठांत सामाजिक आरक्षणासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्के जागा आरक्षित असतील.

श्री बालाजी सोसायटी, पुणे यांच्या माध्यमातून या विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधी हे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे पुणे परिसरातील विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांचा पर्याय उपलब्ध होईल.

नागपुरात होणार रामदेवबाबा युनिव्हर्सिटी

नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेसही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. श्री रामदेवबाबा सार्वजनिक समिती नागपूर यांच्या माध्यमातून या विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विषयाचे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विदर्भातील उद्योगांसाठी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने जिओ-टेक इंजिनीयरिंग, हीट पॉवर इंजिनीयरिंग, एनर्जी मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. याचा फायदा नागपूर परिसरातील विद्यार्थ्यांसह उद्योगांना होणार आहे. या बैठकीत दोन्ही विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधान मंडळासमोर सादर करण्याच्या विधेयकाच्या मसुद्यासही मान्यता देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या