ऑक्टोबरपासून बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुविधा, झोपडपट्टी भागात 50 जागा निश्चित

झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना ऑक्टोबरपासून घराजवळच पालिकेच्या अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रां’साठी पालिकेने झोपडपट्टी भागात 50 ठिकाणे निश्चित केली आहेत. यासाठी आवश्यक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

मुंबईकरांना घराजवळ आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 100 आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. या आरोग्य केंद्रांसाठी पोर्टा केबीनमध्ये दवाखाने सुरू केले जाणार आहेत. पालिकेची नियमित आरोग्य केंद्रे दुपारी 4 वाजता बंद झाल्यानंतरही नवी आरोग्य केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या ठिकाणी तज्ञ डॉक्टर्ससह परिचारिका, सफाई कामगाराची नेमणूकही केली जाणार आहे.

अशी आहे पालिकेची आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य सेवेंतर्गत 211 आरोग्य केंद्रे, 189 दवाखाने, 27 प्रसूतिगृहे, 16 उपनगरीय रुग्णालये, 5 विशेष रुग्णालये आणि तृतीय स्तरीय आरोग्य सेवेंतर्गत 4 वैद्यकीय महाविद्यालये, 5 रुग्णालये, 1 दंत महाविद्यालय आहे. या आरोग्य केंद्रांमुळे पालिकेच्या मोठय़ा आणि उपनगरीय रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी होणारी गर्दी कमी होणार आहे. मुंबईच्या 1 कोटी 30 लाख लोकसंख्येपैकी 60 टक्के लोक झोपडपट्टीत राहत असल्यामुळे हा उपक्रम फायदेशीर ठरेल.

जागेसाठी खासगी जमीन मालकांना आवाहन

आरोग्य केंद्रांच्या उपक्रमासाठी झोपडपट्टीभागात पालिकेला आवश्यक त्या प्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी जमीन मालक, तयार बांधकामाच्या मालकांना आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करणार आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या 600 ते 1000 स्वेअर फूट जागांच्या भाडय़ाचा योग्य मोबदलाही संबंधितांना दिला जाईल. या जागांची निवड वॉर्ड ऑफिसरचा समावेश असलेली त्रीसदस्यीय समिती करणार आहे.