
विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसचे विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठवल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे. याबाबत बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र असे काहीच झाले नसल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलत नाही आणि त्यांचा राजीनामा आमच्याकडे आलेला नाही असे नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
काँग्रेसमध्ये गडबड गोंधळ, प्रदेश अध्यक्षांना हटविण्याची मागणी
नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसमध्ये पुन्हा गडबड गोंधळ सुरू झाला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील घोळाबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताच नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी तर भाजपमधून आलेल्या पटोले यांना चार वर्षात आठ पदे कशासाठी? असा प्रश्न करत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.
गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा (नाना पटोले) बाहेर का निघतो? यामागचा काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावं. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला त्रास देण्याचा काम नाना पटोले यांनी केलं आहे, म्हणूनच थोरात यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणं कठीण झालंय, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.
घरातला प्रश्न घरातच सोडवू
बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. त्यांनी काय पत्र लिहिलंय हे मला माहिती नाही. नाशिक पदवीधर मतदार संघातील या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी 13 फेब्रुवारीला बैठक बोलाकण्यात आली आहे. हा आमच्या घरातला प्रश्न हा घरात सोडवू. थोरातांनी असं कुठलंही पत्र लिहिलं नसेल, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
जे काही घडलं ते चांगलं नाही
विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात जे काही घडले ती चांगली घटना नाही. या सगळ्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती ही एकमेकांना समजून घेण्याची आहे. पक्ष कमजोर होईल, अशी विधाने करणे किंवा कृती करणे योग्य होणार नाही, असे काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांनी म्हटले आहे.