हिंजवडीत बाल्कनी कोसळून १ ठार, ३५ जखमी

18

सामना प्रतिनिधी । पिपंरी-चिंचवड

हिंजवडी परिसरात रविवारी रात्री एका लेबर कॅम्पच्या इमारतीची लोखंडी बाल्कनी कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

औद्योगिक विकासामुळे गेल्या काही काळात पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक गृह प्रकल्पांचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी परराज्यातून आलेला कामगार वर्ग निर्माणाधीन इमारतींच्या परिसरातील तात्पुरत्या निवाऱ्यात राहतो. हिंजवडीतील एका गृह प्रकल्पाच्या फेज तीनमधील इमारतीच्या कामकाज सुरू असलेल्या जागेतही अशाचप्रकारे काही कामगार वास्तव्याला होते. याठिकाणी कामगारांना राहण्यासाठी एक लोखंडी स्लॅब आणि पत्र्यांच्या सहाय्याने तात्पुरती इमारत बनवण्यात आली आहे. काल रात्री ५० ते ६० कामगार या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत जमले होते. एकाचवेळी अधिक वजनामुळे ही बाल्कनी कोसळली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एल.एन. डब्लू लेबर कॅम्प हिंजवडी, फेज ३ येथे एक तात्पुरत्या पत्र्याच्या इमारतीमध्ये तब्बल सातशे ते आठशे कामगार राहतात. काल रात्री दहा वाजता छताची लोखंडी बाल्कनी कोसळून अजब लाल या कामगाराचा मृत्यू झाला. याशिवाय, दुर्घटनेत ३५ कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ज्या व्यक्तीने तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी छत उभारले होते, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या