बालगणेश

508

>>ज्योत्स्ना गाडगीळ<<

सगळ्यांपेक्षा आपला बाप्पा `हटके’ दिसावा असा गणेशभक्तांचा आणि पर्यायाने काही मूर्तीकारांचा प्रयत्न असतो, त्यानुसार बाप्पाच्या रूपामध्ये वैविध्य आणले जाते. ह्याच हट्टापायी भविष्यात, सिक्स पॅकवाला बाप्पा किंवा रजनीकांतच्या रूपातला बाप्पा बघायला मिळाला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, बाप्पाचे हे आधुनिकीकरण स्वीकारण्यास आपले मौनही तेवढेच जबाबदार आहे. सुदैवाने अजूनही काही सुज्ञ मूर्तीकार आहेत, जे ह्या उत्सवाचे पावित्र्य जाणतात आणि त्यानुसार देवाचे देवत्व जपणाऱ्या सुबक मूर्ती घडवतात. असेच मूर्तीकार आहेत, लोअर परळ येथील शिंदे पिता-पुत्र! ५० वर्षांपासून ते शाडूच्या मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत आहेत.

शाडूच्या मातीची मूर्ती बनवणे, हे मुळातच कौशल्याचे काम, त्यात ती मूर्ती अवघ्या एक ते दीड फूट उंचीत बारकाव्यांसह साकारणे हे त्याहून अवघड काम! शाडूची गणेश मूर्ती साकारणारे अनेक मूर्तीकार आज आहेत, परंतु शिंदे पिता-पुत्रांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींमधून बाप्पाचे वेगळेपण जपले आहे. मूर्तीची उंची वाढवण्याच्या स्पर्धेत न उतरता वडील सूर्यकांत शिंदे ह्यांनी दीड फुटांच्यावर मूर्तीची उंची जाऊ न देण्याचा आणि पर्यावरणस्नेही असल्याने शाडूच्या मातीचीच मूर्ती बनवण्याचा नियम कटाक्षाने पाळला, तर त्यांचा मुलगा विशाल, ह्यांने तेवढ्याच उंचीत बसणाऱ्या परंतु वेगवेगळ्या भावावस्थेतील गणेश मूर्ती साकारल्या.

bal-ganesh

सूर्यकांत शिंदे हे गिरणगावात राहणारे गिरणी कामगार. बालपणापासून त्यांची कलाक्षेत्राकडे ओढ होती. करी रोड येथे राहत असताना त्यांच्या घराजवळ पांगम पेंटर गणेश मूर्ती घडवायचे. त्यांच्या कार्यशाळेत जाऊन त्यांच्या कामाचे अवलोकन करण्याचा सूर्यकांतजींना नाद लागला आणि भविष्यात आपणही अशा मूर्ती घडवाव्यात असा ध्यासही लागला. पांगम पेंटर ह्यांच्या सान्निध्यात राहून सूर्यकांतजी गणेश मूर्ती घडवू लागले. मिलमधील नोकरी सांभाळून त्यांनी मूर्तीकाम केले आणि मिल बंद पडल्यावर कलाक्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतले.

विशाल ह्यांनीदेखील बालपणापासून वडिलांना गणेशमूर्ती साकारताना पाहिले होते. वडिलांकडून कलेचा वारसा मिळालाच होता, परंतु रोजच्या सरावामुळे बालवयातच त्यांचीदेखील मूर्तीकामावर पकड बसली. पहिलीत असताना शाडूची पहिली गणेश मूर्ती त्यांनी साकारली होती. इयत्ता चौथीमध्ये असताना तर, त्यांना चार-पाच घरांच्या गणेश मूर्तीची ऑर्डरही मिळाली होती. वडिलांना कामात मदत करता करता विशालदेखील ह्याच व्यवसायाचा भाग बनले. आपल्या कामाला शास्त्राची जोड मिळावी, म्हणून त्यांनी जे.जे. कलामहाविद्यालयातून `चित्रकला’ विषयात पदवी मिळवली. तिथे शिकलेल्या रंगसंगतीचा मूर्तीकामात खूप उपयोग झाला, असे ते सांगतात.

शिंदेंच्या बाप्पाला खळी पडते, तो केवळ पितांबरच नाही, तर पांढरे शुभ्र काठपदरी धोतरही वापरतो, त्याचे सारथी उंदीर त्याच्याबरोबर मोदकाचा आस्वाद घेतात, त्याच्या अंगा-खांद्यावर बागडतात, बाप्पाचा रथ हाकतात. त्यांचा बालगणेश कधी आईच्या अंगावर बागडताना, तर कधी वडिलांच्या सिंहासनावर खेळताना दिसतो. कधी गरुडावर स्वार होतो, तर कधी मोरावर! लहान मूल जसे दोन्ही हातात मोदक धरून बसते, तसा हा बालगणेश आपले मोदक दुसऱ्या कोणालाही देणार नाही अशा अविर्भावात पाटावर ठिय्या मारून बसतो, तर कधी भरल्या पोटी वामकुक्षी घेण्याआधी नुसता पाय पसरून पेंगलेला दिसतो.

ganpati-1

बालगणेशाच्या रूपात हे सगळे बालसुलभ भाव बघत असताना ते आपल्याच घरातल्या बालकाचे प्रतिकात्मक रूप भासते. याबाबत विशाल सांगतात, `बालक कोणतेही असो, कोणाचेही असो, ते आपल्या निरागसपणाने समोरच्या व्यक्तीला जिंकून घेते. पालक आपल्या बालकाचे शेकडो अपराध पोटात घेऊन मोबदल्यात भरभरून प्रेमच देतात. तसा बालगणेश हा देखील शिव-पार्वतीचा लाडोबा आहे. त्याचे कोणतेही रूप आपल्याला भावते, मग बालरूप आपल्याला किती भावेल? हा विचार करत असतानाच मनात बालगणेशाच्या प्रतिमा तयार हाऊ लागल्या. परिसरातील मुलांच्या निरीक्षणातून बाप्पाच्या विविध भावावस्था साकारण्यासाठी मला प्रेरणा मिळू लागली. मनात प्रतिमा तयार झाली, की मी लगेच ती कागदावर रेखाटत असे. २००८-०९ पासून हा प्रयोग करण्यास मी सुरुवात केली आणि गणेश भक्तांनी आणि कलारसिकांनी मोठ्या दिलाने माझ्या कल्पनेचे स्वागत केले.’

साच्यातल्या मूर्तीच्या तुलनेत शाडूची मूर्ती थोडी महाग असते, तरीदेखील पर्यावरणस्नेहींची पसंती शाडूच्या मूर्तीलाच असते. सोशल मिडियामुळे जनजागृती होत आहे, पर्यावरणस्नेहींची संख्या वाढत आहे, परिणामी शाडूच्या मूर्तीला लोकांची पसंती मिळत आहे. गणपती विसर्जनानंतर किनाऱ्यावर पडलेले मूर्तींचे अवशेष बघायला मिळू नयेत, यासाठी लोकांनी इकोफ्रेंडली गणेशाचे स्वागत केले पाहिजे, असे विशाल सांगतात. त्यांच्याकडे असलेल्या एक फूट उंचीच्या गणेशमूर्ती ७-८ हजार रुपयांच्या, तर दीड पूâट उंचीच्या मूर्ती १०-१२ हजार रुपयांच्या असतात.

ganpati-bappa

शिंदेंकडे गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात. दसNयानंतर दर शनिवार-रविवार त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू होतात. विद्यार्थ्यांना थेट मूर्तीकाम शिकवण्याआधी विशाल त्यांच्याकडून मूर्तीची स्केचेस काढण्याचा सराव करून घेतात. ते सांगतात, `एकदा का मूर्तीची प्रतिमा डोक्यात तयार झाली, की हातातून ती प्रत्यक्षात उमटायला वेळ लागत नाही.’ विशाल ह्यांचा ८-१० वर्षांचा मुलगा आर्य शिंदे हादेखील आपल्या वडील आणि आजोबांप्रमाणे कार्यशाळेत जाऊन निरीक्षण करू लागला आहे, मात्र अजून त्याची प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

शाडूची मूर्ती बनवण्याचा वर्षांनुवर्षांचा सराव झाल्यामुळे शिंदे पिता-पुत्र दोन दिवसांत एक देखणी मूर्ती तयार करतात. विशाल, हे मूर्ती घडवण्याचे तर वडील सूर्यकांत, मूर्तीवरील बारकावे रेखाटण्याचे काम करतात. त्यांच्याकडे असलेले दोन कारागीर मूर्तीचे रंगकाम करतात. यंदा त्यांच्या कार्यशाळेत साधारण २०० मूर्ती तयार झाल्या आहेत. २० ऑगस्ट रोजी सर्व रसिकांना त्यांच्या लोअर परळ येथील वेस्टर्न रेल्वे वर्कशॉपच्या विरूध्द बाजूला असलेल्या `त्रिमूर्ती’ कार्यशाळेत जाऊन बालगणेशाचे दर्शन घेता येणार आहे.

प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू ह्यांनी नेहमीच माझ्या कामाचे कौतुक केले आणि मला मार्गदर्शन केले. गेल्याच महिन्यात त्यांनी मला एक विदेशी बनावटीचा एअर ब्रश भेट दिला होता. यंदा त्यांना माझे काम दाखवायचेच राहून गेले, त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे.
–विशाल शिंदे (मो :९३२३७९०९०४)

आपली प्रतिक्रिया द्या