बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटना; दोन अधिकारी निलंबित

बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे करण्यात आली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव याना निलंबित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर ओवर ब्रीज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी असे या शिक्षिका असलेल्या मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या कुटंबीयांना आर्थिक साहाह्यासोबतच कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याची मागणी देखील धानोरकर यांनी केली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई रेल्वेकडून करण्यात आली आहे.