अग्नी-६ क्षेपणास्त्राची लवकरच होणार चाचणी

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अग्नी-५ क्षेपणास्त्राच्या चार चाचण्या घेतल्यानंतर हिंदुस्थानने अग्नी-६ या क्षेपणास्त्राच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-६ क्षेपणास्त्राची लवकरच चाचणी घेतली जाईल. या संदर्भात अधिकृत घोषणा डीआरडीओकडून केली जाईल.

अग्नी-५ क्षेपणास्त्र विशिष्ट ठिकाणी एक ते दिड हजार किलो वजनाच्या अणुबॉम्बद्वारे हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र पाच ते साडेपाच हजार किमी. पर्यंतच्या टप्प्यात कुठेही हल्ला करण्यास सक्षम आहे. मात्र अग्नी-६ मुळे हिंदुस्थान एका क्षेपणास्त्राद्वारे एकाचवेळी अनेक ठिकाणी अणुबॉम्बद्वारे हल्ला करू शकेल. शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांना चकवण्यासाठी अग्नी-६मध्ये स्वयंचलित अशी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे.

हिंदुस्थान अग्नी-५च्या यशस्वी चाचणीमुळे अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अग्नी-६च्या विकासात यशस्वी झाल्यास हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या