नवीन कामांच्या निविदा भरण्यास ‘ए.सी.कोठारी’ या संस्थेवर निर्बंध

24

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महापालिकेतील प्रमुख ठेकेदार संस्था ए. सी. कोठारी यांच्याकडील तब्बल १९ कामे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने आणखी एक मोठा दणका दिला आहे. प्रलंबित असलेली कामे पूर्ण होईपर्यंत मनपाच्या बांधकाम विभागातील नवीन कामांच्या निविदा भरण्यास ‘ए.सी.कोठारी’ या संस्थेवर निर्बंध आणण्यात आले आहेत. दरम्यान, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ए.सी.कोठारी या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यावर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बोल्हेगाव येथील रस्त्याचे काम रखडल्याप्रकरणी महापालिकेत शिवसेनेने आंदोलन केले होते. यात शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर संतप्त कार्यकर्त्याने बूट फेकला होता. मनपातील बहुचर्चित ठरलेल्या या घटनेनंतर कामे रखडविणार्‍या ठेकेदारांविरोधात कठोर कारवाईची पावले मनपाकडून उचलण्यात आली आहेत. ठेकेदार संस्था ए.सी.कोठारी यांच्याकडे मनपा निधीतील तब्बल १९ कामे प्रलंबित होती. २०१३ ते २०१७ या काळातील ही कामे रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. तसेच शासकीय निधीतील कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या होत्या. मनपाच्या आजवरच्या इतिहासात मोठ्या ठेकेदार संस्थेवर प्रथमच कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यापाठोपाठ महापालिकेने ए.सी.कोठारी यांना आणखी एक दणका दिला आहे.

वर्षानुवर्षे ए.सी.कोठारी या संस्थेकडून अनेक कामे रखडविण्यात आली आहेत. त्यामुळे नगरकरांमध्ये नाराजी आहे. नगरसेवक, अधिकार्‍यांना यामुळे जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडील सर्व कामे रद्द करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली होती. मनपाने त्यांच्याकडील काही कामे रद्द केल्यानंतर आता ए.सी.कोठारी यांच्याकडे शासकीय योजनेतील प्रलंबित असलेली कामे पूर्ण केल्याशिवाय मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कोणत्याही कामाची निविदा भरण्यास त्यांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे जुनी कामे पूर्ण होईपर्यंत नवीन कामे घेण्यास ए.सी.कोठारी या संस्थेवर आता निर्बंध आले आहेत. शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांची ‘फेव्हरेट’ संस्था असलेल्या ठेकेदारावर मनपाने निर्बंध लादल्यामुळे ठेकेदार वर्तुळातच चांगलीच खळबळ उडाली आहे. मनपाच्या या कारवाईनंतर राजकीय नेते व नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या