सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळी बंद

103

सामना ऑनलाईन । कळवण

सप्तश्रृंगी गडावर गेल्यावर्षी दसऱ्याला बोकडबळी देतांना मानवंदनेप्रसंगी (हवेत गोळीबार) १२ जण जखमी झाले होते. यामुळे भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन यंदापासून बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वर्षानुवर्षाची ही परंपरा बंद करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय असून याबाबत सर्वत्र प्रशासनाचे कौतुक होत आहे. मात्र श्रध्दा म्हणून पाहणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा धक्कादायक निर्णय असल्याची चर्चा आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी गडावर २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय झाला. बोकडबळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. मंदिर परिसरात बंदी कायम राहील. स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय घडते याकडे आता लक्ष लागून आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज

१ अतिरिक्त अधीक्षक, २ डीवायएसपी, १० निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, २५० होमगार्ड, एसआरपीएफची एक टीम व घातपात विरोधी एक पथक, नागरी सुरक्षा व सेवाभावी यंत्रणेची ५० अशी यंत्रणा यात्राकाळात सज्ज राहील, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.

  • स्वछता अभियान राबविण्यात येणार असल्याने सेवाभावी संस्थांनी या कार्यात पुढे येण्याचे आवाहन
  • चाचणी प्रक्रिया अपूर्ण असल्याने रोप वे सेवा मिळणार नाही
  • उत्सव काळात मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले
  • प्रदक्षिणा मार्ग बंद
  • गड व परिसरात ६७ सीसीटीव्ही कॅमेरे
  • गड व परिसरात प्लॅस्टिक बंदी
  • वीज, पाणी, मोफत अन्नदान, प्रथमोपचार सेवा
आपली प्रतिक्रिया द्या