‘अलिबाग से आया क्या’ डायलॉग बंदी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सामना प्रतिनिधी । अलिबाग

‘अलिबागसे आया क्या’ असे बोलून अलिबागकरांचा अपमान केला जातो. त्यामुळे या डायलॉगवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अलिबागचे रहिवासी राजा ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. यावर न्यायालयाने अलिबागकरांच्या भावनांचा विचार करायला हवा होता, असं अलिबागकर म्हणत आहेत.

‘अलिबागसे आया क्या’ हा संवाद सिनेमात नेहमी वापरला जातो. तसेच टिक टॉक सारख्या सोशल मिडियावरही या संवादाची खिल्ली उडवली जात आहे. अलिबाग हा रघुजी आंग्रे, थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी, शिल्पकार करमरकर, अभिनेत्री अश्विनी भावे यासारख्या दिग्गज व्यक्तींचा हा तालुका आहे. ‘अलिबागसे आया क्या’ असे संवाद बोलून अलिबागकरांची खिल्ली उडवली जात आहे. याबाबत अलिबागकरांनी अनेक वेळा आवाज उठविला होता. याबाबत याचिकाही उच्च न्यायालयात दाखल केली होती.

आता ‘अलिबागसे आया क्या’ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असल्याने पुढील काळात अलिबागबाबत बदनामी कारक संवाद पुन्हा सिनेमात ऐकायला मिळतील अशी भीती निर्माण झाली आहे.

मी उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. परंतु अलिबागकरांच्या भावनांचा विचार केला असता तर बर वाटलं असत, अशी प्रतिक्रिया अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.

मी अजून न्यायालयाचा पूर्ण निकाल वाचलेला नाही. परंतु एखाद्या गावाची बदनामी होत असेल तर ती रोखली पाहिजे. आपल्या गावाबद्दल भावना जोडलेल्या असतात. या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, असे मत रायगड जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. श्रद्धा ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

उच्च न्यायालयाने कोणत्या कारणांने ही याचिका फेटाळली आहे. आपण कुठे कमी पडलो आहोत, याचा अभ्यास करून याबाबत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी, असे कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या