केळं चोरलं म्हणून वाद पेटला, भजीवाल्याने भाजीवाल्यावर उकळतं तेल फेकलं

992

दुकानातून केळं चोरलं म्हणून जाब विचारल्याने भाजीवाल्यावर उकळतं तेल फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरीश जट्टी नावाच्या भाजीविक्रेत्याने या प्रकरणी भजीवाल्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे नागराजू नावाच्या भजीविक्रेत्याविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे. सदर घटना 10 मार्च रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

कर्नाटकातील मराठाहळ्ळी भागामध्ये जेपी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये हरीश भाजी विकण्याचा व्यवसाय करतो. त्याच्या ठेल्याशेजारीच नागराजूचा भजी बनवण्याचा ठेला आहे. नागराजू हा भजी विकण्याचं काम करतो. गेल्या मंगळवारी हरीशच्या दुकानातून नागराजूने त्याला न सांगता केळं घेतलं. या केळ्याची त्याला भजी बनवून विकायची होती. हरीशने आपल्या दुकानातील केळं नागराजूने घेतल्याचं पाहिलं होतं. त्याने नागराजूकडे केळ्याचे पैसे मागितले. पैसे मागितल्याने भडकलेल्या नागराजूने हरीशसोबत वाद घालायला सुरुवात केली. रागाने बेफाम झालेल्या नागराजूने भजी तळण्यासाठीचं उकळतं तेल हरीशच्या तोंडावर फेकलं.

नागराजू आपल्या दुकानातून सतत केळी चोरत असल्याचं हरीशला माहिती होतं, मात्र त्याच्याकडे पुरावा नसल्याने तो त्याला काही बोलत नव्हता. 10 मार्च रोजी हरीशने नागराजूला केळं चोरताना रंगेहाथ पकडलं होतं.हरीशने त्याच्या तक्रारीत म्हटलंय की ‘नागराजूने त्याच्या दुकानातील एक केळं घेतलं आणि तो बिनधास्तपणे त्याच्या ठेल्यावर जात होता. त्याला हटकल्यानंतर त्याने रागाच्या भरात तेल फेकलं’ हरीशने त्याला तेल फेकताना पाहिल्याने त्याने डोळे बंद करून घेतले आणि हाताचा आडोसा करण्याचा प्रयत्न केला. मात्र गरम तेलाचे शिंतोडे तोंडावर उडाल्याने हरीश काही प्रमाणात भाजला होता. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर हरीशने नागराजूविरोधात तक्रार नोंदवली.

तक्रारीचा तपास करणाऱ्या पोलिसांनी म्हटलंय की हरीश आणि नागराजू हे दोघे चांगले मित्र होते. नागराजू त्याच्या दुकानातून यापूर्वीही केळी फुकटात घेत होता. हरीशने त्याला इतकंच सांगितलं होतं की तू केळी घे मात्र मला सांगून घेत जा. मात्र नागराजू हरीशच्या नकळत केळी चोरत होता ज्याचा हरीशला राग आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या