वांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका

सामना ऑनलाईन, मुंबई

वांद्रे येथील एमटीएनएलच्या नऊ मजली इमारतीत भीषण आग लागल्याची दुर्घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पोटमाळय़ावर असलेल्या लेखा विभागात आगीची ठिणगी पडली आणि पाहता पाहता ही आग तिसऱ्या व चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. इमारतीतील कर्मचारीवर्ग जिवाच्या आकांताने पळू लागला. लिफ्ट तर बंद झालीच होती, पण जिन्याने खालीही जाणे केवळ अशक्य होते. त्या काळय़ा धुराच्या लोटामध्ये ऐकू येत होता फक्त आक्रोश आणि मदतीसाठी टाहो. कर्मचाऱ्यांकडे एकच पर्याय होता, टेरेस गाठणे. झालेही तसेच. सर्वांनी टेरेसच्या दिशेने धाव घेतली आणि दोन तासांच्या बचाव मोहिमेनंतर अग्निशमन दलाने टेरेसवरील सर्व 84 कर्मचाऱ्यांना सुखरूप खाली आणले.

नजर टेरेसकडे

दुर्घटनेची माहिती मिळताच एमटीएनएलच्या इतर कार्यालयांतील कर्मचारी, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वत्र आक्रोश सुरू होता आणि नजर होती ती टेरेसवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांकडेच. अग्निशमन दलाच्या शिडीने टप्याटप्प्याने कर्मचारी सुखरूपपणे खाली येत होते आणि खाली उतरताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता तो मृत्यूच्या कराल दाढेतून सुटका झाल्याचा आनंद. काहींच्या अश्रूंचा बांधही फुटला.

दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी ही आग लागली आणि कर्मचाऱ्यांपासून अग्निशमन दलापर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली. इमारतीच्या शेजारीच अग्निशमन केंद्र असल्याने मदत तत्काळ पोहचली, पण आगीचे रौद्ररूप पाहून आणखी 14 गाडय़ा घटनास्थळी बोलावण्यात आल्या.

आग लागल्यानंतर सर्वत्र प्रचंड धूर पसरला होता. वांद्रे रेल्वे स्थानक, खार, सांताप्रुझपर्यंत परिसरात धूरच धूर झाला होता. धुरामुळे पादचाऱ्यांनाही चालणे मुश्कील झाले होते.

एमटीएनएल इमारतीच्या मागील बाजूस अंजुमन इस्लाम शाळा असून शाळेच्या इमारतीत धूर पसरल्याने काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. शाळेत तेव्हा 1200 विद्यार्थी होते. प्रशासनाने तातडीने संपूर्ण शाळा रिकामी केली आणि विद्यार्थ्यांना वर्ग सोडून मैदानावर येण्यास सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या