प्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट

130

सामना ऑनलाईन । बॅकाँक

प्रत्येक देशातील मंदिराच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात. काही मंदिरे त्यांच्या प्रथेमुळे नावारुपास येतात. थायलंडमध्ये असेच एक अनोखे मंदिर आहे. प्रजननशक्ती वाढवण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीसाठी या देवीच्या मंदिरात लिंगाची प्रतिकृती अर्पण करण्यात येते. त्यामुळे अपत्यप्राप्ती होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिर परिसरात प्रसाद, पूजा सामग्रीसह लिंगाच्या प्रतिकृतीची दुकानेही मोठ्या प्रमाणात आहे. ही प्रथा परंपरा विचित्र वाटते. मात्र, या उपायाने हमखास अपत्यप्राप्ती होते, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने हे मंदिर लोकप्रिय होत आहे.

थायलंडमधील स्यान नदीच्या काठावर बॅकाँकमध्ये हे अनोखे मंदिर आहे. एका मठात हे मंदिर असून येथे चाओ माई तुप्तीम या देवीची पूजा करण्यात येते. या मंदिरात भाविक लाकडी,दगडी आणि रबराच्या लिंगाच्या प्रतिकृती देवीला अर्पण करतात. एका कथेनुसार नाई लर्ट नावाच्या व्यक्तीने या मंदिराची स्थापना केली. या स्थानातील एका वृक्षात पवित्र आत्म्याचा निवास असल्याने भाविकांच्या इच्छा पूर्ण होतील अशी लर्ट यांची धारणा होती. भाविक या मंदिरात सुगंधी फूल, चंदन आणि नेवैद्य अर्पण करत होते. झालेल्या दृष्टांतानुसार अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या एका महिलेने या मंदिरात लाकडी लिंगाची प्रतिकृती अर्पण केली. त्यानंतर ती महिला गर्भवती झाली आणि तिला अपत्यप्राप्ती झाली. त्यानंतर या घटनेची माहिती पसरल्यानंतर ही प्रथा रुढ झाली. या प्रथेचा भाविकांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार झाल्याने येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. थायलंडमध्ये येणारे पर्यटकही या अनोख्या मंदिराला भेट देत आहेत.

चाओ माई ही बुद्धपूर्व काळातील वृक्षावर निवास करणारी देवी आहे, असे मानतात. चाओ माई तृप्तीम ही प्रजननशक्तीची देवी असल्याची मान्यता आहे. त्यामुळे पूर्व आशियासह थायलंडमधील अनेक भाविक मंदिरात येऊन प्रजननशक्ती वाढण्यासाठी देवीची प्रार्थना करतात आणि लिंगाची प्रतिकृती देवीला अर्पण करतात. प्राचीन सिंधु संस्कृतीतही लिंग आणि योनीपूजेची प्रथा रुढ होती. त्या प्रथेशी साधर्म्य असणारी ही परंपरा आहे. या देवीवर भाविकांची श्रद्धा आणि आस्था आहे. या मंदिरात देवीला चमेलीचा हार, अगरबत्ती, आणि कमळाचे फूलही अर्पण करण्यात येते. या मंदिरात देवीला लिंगाची प्रतिकृती अर्पण करून तिचा पूजा केल्यास अपत्यप्राप्ती होते असे अनेक भाविकांनी सांगितले. या देवीला नर्तकी, हत्ती आणि घोड्याची प्रतिकृती अर्पण करण्याचीही परंपरा आहे. या मंदिराला पहिल्यांदा भेट देणारे भाविक येथे अर्पण करण्यात आलेल्या या प्रतिकृतींमुळे आश्चर्यचकीत होतात. मात्र थायलंडमधील अनेक भाविकांचे प्राचीन सभ्यतेशी जवळचे नाते असून ते खुल्या विचारांचे आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना ते या प्रथेबाबतची माहिती दोतात. थायी संस्कृतीत लिंगाची प्रतिकृती प्रजननशक्ती वाढवणारी मानण्यात येत असल्याने अनेक भाविक घरातही अशा प्रतिकृती ठेवतात. तसेच अशा प्रतिकृतीमुळे सुखसमृद्धी येत असल्याची त्यांची मान्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या