शाकीबचे खणखणीत द्विशतक! बांगलादेशच्या ७ बाद ५४२ धावा

100

रहीमसोबत केली ३५९ धावांची विक्रमी भागीदारी

 वेलिंग्टन – अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन व यष्टिरक्षक कर्णधार मुशफिकर रहीम यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या ३५९ धावांच्या ऐतिहासिक भागीदारीच्या जोरावर बांगलादेश क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ७ बाद ५४२ धावा फटकावल्या. शाकीब अल हसनने झळकावलेले पहिलेवहिले द्विशतक आणि मुशफिकर रहीमचे कसोटीतील चौथे शतक कसोटीच्या दुसऱया दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. शाकीब अल हसनने २१७ धावा तर मुशफिकर रहीमने १५९ धावांची खेळी साकारली.

पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे फक्त ४०.२ षटकांचाच खेळ होऊ शकला. मात्र पहिल्या दिवशी पावसाचा खेळ रंगल्यानंतर दुसऱया दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. शाकीब अल हसन व मुशफिकर रहीम या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. शाकील अल हसनने २७६ चेंडूंचा सामना करीत ३१ चौकारांनिशी २१७ धावा फटकावल्या. तर मुशफिकर रहीमने २६० चेंडूंचा सामना करीत ४ षटकार व २३ चौकारांनिशी १५९ धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडकडून नील वॅगनरने ३ बळी गारद केले. कसोटीचे तीन दिवस अद्याप बाकी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या