बांगलादेशचे आव्हान कायम, अफगाणिस्तानवर 62 धावांनी दमदार विजय

bangladesh-beat-afghanistan

सामना ऑनलाईन । साऊदम्पटन

शाकीब अल हसन व मोसादेक हौसेनची अष्टपैलू चमक… मुशफिकर रहीमच्या धडाकेबाज 83 धावा… अन् मुस्तफिझुर रहमानच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने सोमवारी येथे झालेल्या वर्ल्ड कप लढतीत अफगाणिस्तानवर 62 धावांनी दमदार विजय मिळवला आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. शाकीब अल हसनची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. बांगलादेशने सात सामन्यांमधून तीन विजयांसह सात गुणांची कमाई केली असून अफगाणिस्तानला सलग सातव्या पराभवाचा चेहरा पाहावा लागला. या विजयासह बांगलादेशने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली.

29 धावांत पाच बळी

बांगलादेशकडून मिळालेल्या 263 धावांचा पाठलाग करणाऱया अफगाणिस्तानचा डाव 200 धावांमध्येच गडगडला. शाकीब अल हसनने 10 षटकांत अवघ्या 29 धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद सैफुद्दीन व मोसादेक हौसेन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अफगाणिस्तानकडून कर्णधार गुल्बदीन नैबने 47 धावांची आणि समीउल्लाह शीनवारीने नाबाद 49 धावांची खेळी साकारली, पण त्यांना विजय मिळवून देता आला नाही. शाकीब हा विश्वचषकात पाच विकेट आणि अर्धंशतकी खेळी करणारा युवराजसिंहच्या नंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.

दोन अर्धशतके

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बांगलादेशने 50 षटकांत 7 बाद 262 धावा तडकावल्या. शाकीब अल हसनने 51 धावांची आणि मुशफिकर रहीमने 83 धावांची जबरदस्त खेळी साकारली. शाकीब अल हसनने एक चौकार, तर मुशफिकर रहीमने एक षटकार व चार चौकार चोपून काढले. मुजीब उर रहमानने 39 धावा देत तीन फलंदाज बाद केले. गुल्बदीन नैबने दोन फलंदाज बाद केले.

धावफलक

बांगलादेश: तमिम त्रि. गो. नबी 36, शाकीब पायचीत गो. मुजीब 51, मुशफिकर झे. नबी गो. दौलत 83, मोसादेक त्रि. गो. नैब 35. अवांतर – 9. एकूण 50 षटकांत सात बाद 262.

गोलंदाजी: मुजीब 10-0-39-3.

अफगाणिस्तान: गुल्बदीन झे. लिटन गो. शाकीब 47, शीनवारी नाबाद 49. अवांतर 13. एकूण: 47 षटकांत सर्व बाद 200. गोलंदाजी: शाकीब 10-1-29-5, मुस्तफिझुर 8-1-32-2.