बांगलादेशात विदेशातून कट कारस्थान झालं का? सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सवाल; तो पाकिस्तानी अधिकारी चर्चेत

बांगलादेशमधील अराजक स्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठकीत केंद्र सरकारने बांगलादेश आणि शेख हसीना यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली आहे. बैठकीत उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न केले.

तत्काळ आणि दीर्घकालीन रणनीतीबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न केला. बांगलादेशात जे काही घडलं, त्यामागे विदेशी शक्तींचा हात आहे का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट केली.

बैठकीत बांगलादेशातील बदलत्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने सोशल मीडियावर आंदोलनाचा फोटो डीपीवर लावला होता. आता त्याची माहिती मिळवण्यात येत आहे, असेही बैठकीत सरकारकडून सांगण्यात आले.

सरकारने बैठकीत काय सांगितले?

बांगलादेशात आरक्षणावरून हिंसाचार उफाळला आहे. यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या हिंदुस्थानच्या आश्रयाला आल्या आहेत. मात्र, त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. ब्रिटनकडून आश्रय दिला जात नाही तोपर्यंत शेख हसीना या हिंदुस्थानात राहतील. पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या शेख हसीना यांना सोमवारी हिंदुस्थानात प्रवासाची परवानगी दिली होती, अशी माहिती सरकारने दिली.

बांगलादेशातील स्थितीवर सरकार सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या बांगलादेशात 12000 ते 13000 भारतीय नागरीक आहेत. पण बांगलादेशातील स्थिती इतकीही भीषण नाही की तिथून नागरिकांना बाहेर काढवं लागेल. तिथे एकूण 20000 नागरीक अडकले होते. त्यापैकी 8000 विद्यार्थी मायदेशात परतले आहेत, अशी माहिती सरकारने दिली.