बांगलादेशातून आणलेल्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला खिळीखिळी करण्यासाठी बांगलादेशातून दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आणण्यात आल्या होत्या. पण डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स (डिआरआय)च्या पथकाने त्या नोटा चलनात आणण्याआधीच जप्त केल्या. डिआरआयच्या पथकाने तीन ठिकाणी छापेमारी करीत एकाला अटक करून 18 लाख 76 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या.

नागपूर शहरातल्या बडा ताजबाग परिसरात एक इसम मोठय़ा प्रमाणात बनावट नोटा घेऊन लपला आहे. लवकरच तो विविध माध्यमातून त्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती डिआरआयच्या  मुंबई झोनल युनीटच्या नागपूर युनीटला मिळाली. त्यानुसार नागपूर युनीटने  त्याठिकाणी छापा मारून लालू खान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 13 लाख 67 हजार 500 रुपये किमतीच्या बनावट नोटा सापडल्या. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य दोन ठिकाण बनावट नोटा लपविलेल्या असल्याचे समोर येताच सीताबर्डी परिसरात छापा मारून 89 हजार किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर  डिआरआयच्या इंदौर झोनल युनीटने चार लाख 17 हजार 500 किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर बांगलादेशातून हिंदुस्थानात या बनावट नोटा आणण्यामागे आंतरराष्ट्रीय  टोळीचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या