हिंदुस्थानात अवैधरित्या राहणाऱ्या आपल्या लोकांना बांगलादेश स्वीकारणार, केली मोठी घोषणा

7624

हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या आपल्या लोकांना बांगलादेश स्वीकारणार आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. हिंदुस्थानने याची यादी बांगलादेशला द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच दोन्ही देशांमधील संबंध सलोख्याचे आहेत. एनआरसीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, असेही मोमेन यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी एनआरसीबाबत देशाची भूमिका स्पष्ट केली. एनआरसी हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे हिंदुस्थानने आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे याचा बांगलादेशवर प्रभाव पडणार नाही, असे मोमेन म्हणाले. तसेच हिंदुस्थानमधून जबरदस्तीने लोकांना बांगलादेशमध्ये पाठवण्यात येणार आहे हे वृत्तही मोमेन यांना फेटाळून लावले. बांगलादेशींशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने आमच्या देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला हाकलून लावू. आम्ही हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी लोकांची यादी मागवली आहे, या सर्वांना आम्ही परतण्याची संधी देऊ, असेही मोमेन यांना स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण हिंदुस्थानचा दौरा का रद्द केला असा प्रश्न मोमेन यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, हिंदुस्थान दौरा आणि बांगलादेशचा विजय दिवस एकाच वेळी येत होता. यासह विदेश राज्यमंत्री शहरयार आलमही विदेशदौऱ्यावर आहेत. या परिस्थितीमध्ये मला हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या