हसनने हिंदुस्थानला रडवले, बांगलादेशात सलग दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका गमावली

टीम इंडियाने बांगलादेश दौऱ्यावर सलग दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका गमावली. यजमान बांगलादेशने लागोपाठ दोन विजय मिळवीत तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका आधीच खिशात घातली. कर्णधार रोहित शर्माला दुखापतीनंतरही नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले. त्याने हिंदुस्थानच्या विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, शेवटी यजमान संघाने चुरशीचा दुसरा सामना 5 धावांनी जिंकला. शतकवीर मेहदी हसनने अष्टपैलू कामगिरी करत टीम इंडियाला रडविले.

बांगलादेशकडून मिळालेल्या 272 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. रोहित शर्माला दुखापत झाल्याने विराट कोहली हा शिखर धवनच्या साथीला सलामीला आला. मात्र, विराट (5) व शिखर (8) जोडी अवघ्या 13 धावांत तंबूत परतली. मधल्या फळीत श्रेयस अय्यर (82) व अक्षर पटेल (56) यांनी अर्धशतके झळकवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 चेंडूंत 107 धावांची भागीदारी केली. श्रेयसने 102 चेंडूंत 6 चौकारांसह 3 षटकार ठोकले, तर अक्षरने 56 चेंडूंत 3 षटकारांसह 2 चेंडू सीमापार पाठविले. वॉशिंग्टन सुंदर (11), लोकेश राहुल (14), शार्दुल ठाकूर (7) व दीपक चहर (11) हे मधल्या फळीतील फलंदाज बाद झाल्याने अनफिट रोहित शर्माला 46व्या षटकात फलंदाजीला यावे लागले.

रोहित शर्माची झुंज अपयशी ठरली

टीम इंडियाचा डाव संकटात असताना रोहित शर्मा दुखापत विसरून फलंदाजीला आला. त्याने जखमी वाघाप्रमाणे बांगलादेशच्या गोलंदाजीवर तुटून पडताना 28 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 51 धावांची खेळी केली. एकवेळ हिंदुस्थानला विजयासाठी 18 चेंडूंत 40 धावांची गरज होती. मात्र, मोहम्मद सिराजने मुस्तफिझुरचे 47 वे षटक निर्धाव खेळल्याने चेंडू अन् धावांचे गणित बिघडले. हिंदुस्थानला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूवर 2 षटकारांची गरज होती. मात्र, रोहितला एकच षटकार ठोकता आला अन् हिंदुस्थानचा पराभव झाला. बांगलादेशकडून इबादत हुसैनने 3, तर मेहदी हसन व शाकिब अल हसन यांनी 2-2 गडी बाद केले. मुस्ताफिझुर रहमानला एक बळी मिळाला.