भांडणात वडिलांची बाजू घेतली, माथेफिरु आईने तीन वर्षाच्या मुलीची केली हत्या

नवऱ्यासोबत टिव्हीच्या रिमोटवरुन झालेल्या वादात तीन वर्षाच्या लेकीने वडिलांना साथ दिली म्हणून एका माथेफिरु आईने मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बंगळूरु येथे घडला आहे. पोलिसांनी या माथेफिरु आईला अटक केली आहे.

सुधा असे या महिलेचे नाव असून ही महिला बंगळूरु येथे टाईल्सच्या एका दुकानात हाऊसकिपींगचे काम करते तर पती इरन्ना मजूरीचे काम करतो. त्यादिवशी सुधा आणि तिच्या नवऱ्याचे टिव्हीच्या रिमोटवरुन भांडण झाले. त्यात मुलीने वडिलांची बाजू घेतली होती. मुलगी वारंवार वडिलांचीच बाजू घेत असल्याने संतापलेल्या माथेफिरु आईने मुलीचा काटा काढायचा ठरवले. घराच्या जवळच बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिची गळा दाबून हत्या केली.

कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून या माथेफिरु महिलेने मुलीची हत्या केल्यानंतर ती बेपत्ता असल्याचे नाटक रचले. तिने पतीसोबत पोलीस स्थानकात जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली. तिने पोलिसांना सांगितले की मुलीला बाहेर गोबी मंचुरिअन खायला घेऊन गेली होती. जेव्हा ती पैसे द्यायला गेली तेव्हा मागे मुलगी नव्हती. तिला बराचवेळ शोधूनही ती सापडली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी एक बांधकाम सुरु असलेल्या इमारती जवळून जात असता एका व्यक्तीला तिथे एक मृतदेह आढळला. त्याने त्याबाबतची पोलिसांना माहिती दिली. तपास केला असता त्या महिलेची मुलगी असल्याची ओळख पटल्यावर मुलीच्या आई आणि वडिलांना बोलवण्यात आले. ती मुलगी त्यांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी गोबी मंचुरियन खायला कुठे गेली होतीस हे विचारले असता तिने अडखळत उत्तरे दिली. पोलिसांना मुलीच्या आईवर संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी तिची कसून चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल करुन मुलीची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या