बंजारा समाजाची आगळी-वेगळी पारंपारिक होळी

201

प्रसाद नायगावकर । यवतमाळ

लोकासंस्कृतीचे दर्शन घडविणारा रंगोत्सव होळी आणि रंगपंचमी हा सण प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बंजारा समाजानेही आपली होळीची आगळी-वेगळी परंपरा जपली आहे. बंजारा समाजाची होळी आणि त्यानंतर होणारा लेंगी महोत्सव ही एक सांकृतिक पर्वणीच असते. गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाने होळीचे अस्सलपण, आणि परंपरा टिकवून ठेवली आहे.

यवतमाळ हा बंजारा बहुल जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यात डिग्रस आणि पुसद या दोन तालुक्यात तर सर्वाधिक बंजारा बांधवांचे वास्तव्य आहे. बंजारा समाजात होळी सणात धुंड आणि गेर ही एक वेगळी पद्धत आहे. याविषयी बंजारा लोकांची एक दंत कथा आहे. पूर्वी एक धुंडी नावाची राक्षसीण रात्री तांड्यात येऊन लहान बाळांना खात असे. कंटाळून लोकांनी त्या राक्षसिणीस धडा शिकविण्याचे ठरविले. एका पौर्णिमेच्या रात्री लाठ्या-काठ्या, गोफण घेऊन सर्व जण जमा होतात. नेहमीप्रमाणे राक्षसिण तांड्यात आली व बंजारा लोकांची टोळी पाहून न्यायकाच्या घरात घुसते. न्यायकाच्या घरातून तिला बाहेर काढून तिला ठार करतात आणि तिची होळी करतात.

बाळांच्या जीवनावरील धोका टळला आणि राक्षसिणीचा अंत झाला म्हणून बंजारा लोक होळी हा सण साजरा करतात अशी दंतकथा आहे. वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा ‘धुंड’ म्हणजेच वाढदिवस साजरा करतात. अशी ही बंजारा समाजाची आगळी-वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा आहे. लोककलेचा सुंदर आविष्कार या निमित्ताने प्रत्येक तांड्यावर पहावयास मिळतो. डफडीचा आवाज घुमू लागला की त्याच्या तालावर तांड्यातील लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्वच फेर धरून आनंदोत्सव साजरा करतांना दिसतात.

आपली प्रतिक्रिया द्या