बँक बुडाली तर ठेवीदारांना 90 दिवसांत पैसे परत मिळणार, पाच लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित

बँक बुडाल्यानंतरही ठेवीदारांची 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहणार असून, 90 दिवसांच्या आत हे पैसे परत केले जाणार आहेत. यासंबंधीच्या डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड व्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट (डीआयसीजीसी) दुरुस्ती विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

गेल्या काही वर्षांत आर्थिक घोटाळय़ांमुळे बँका दिवाळखोरीत निघण्याचे प्रमाण वाढले आहे. पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बुडाली. लक्ष्मी विलास, येस बँकाही दिवाळखोरीत निघाल्या याचा फटका लाखो ग्राहकांना बसला. अद्यापही ठेवीदारांना आपले पूर्ण पैसे मिळाले नाहीत. ‘पीएमसी’बँक बुडाल्यानंतर केंद्र सरकारने ठेवी विम्याची मर्यादा पाच पट वाढविण्याची घोषणा केली होती; पण कोरोनामुळे वर्षभर याची अंमलबजावणी झाली नाही. आज मंत्रिमंडळ बैठकीत ‘डीआयसीजीसी’ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. हे विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. सध्या बँक बुडाल्यास ग्राहकाची एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहत होती. आता ही सुरक्षित रक्कम पाच लाखांपर्यंत झाल्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

एकापेक्षा जास्त खाती असली तरी पाच लाखांपर्यंतचीच गॅरंटी

  • जर ग्राहकाची एकाच बँकेच्या विविध ब्रँचमध्ये एकापेक्षा जास्त खाती असली तरी त्या सर्व खात्यांमधील एकत्रित पाच लाखांपर्यंतचीच रक्कम सुरक्षित असेल. 90 दिवसांत ही रक्कम ग्राहकाला परत मिळेल.
आपली प्रतिक्रिया द्या