बँकेतील जमा रकमेवर 5 लाखांपर्यंत मिळणार विमा कवच!

2097

बँकेत जमा असलेल्या खातेदारांच्या रकमेवर 1 लाखाचे असलेले विमा कवच वाढवून ते 5 लाखपर्यंत करण्याचा विचार अर्थ मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात खातेदारांची गुतंवणूक असल्यास हे कवच 25 लाख करण्यावरही विचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबर महिन्यात याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते.

हा निर्णय अंमलात आल्यास 1993 नंतर पहिल्यांदाच विम्याच्या रकमेत वाढ होणार आहे. 1992 मध्ये बँक ऑफ कराड दिवाळखोर घोषित करण्यात आली होती. त्यानंतर 1 जानेवारी 1993 ला बँकेतील जमा रकमेवर 30 हजाराचे असलेले विमा कवच वाढवून ते 1 लाख रुपये करण्यात आले होते. या विमा कवचामुळे बँक बुडाल्यास किंवा दिवाळखोर घोषित झाल्यास खातेदारांना जमा रकमेपैकी जास्तीतजास्त 1 लाखापर्यंतची रक्कम परत मिळू शकते. त्यामुळे खातेदारांने कितीही रक्कम बँकेत जमा केली असेल तरीही त्याला 1 लाखांपर्यंतचीच भरपाई मिळते. रिझर्व्ह बँकेच्या सब्सिडियरी डिपॉजिट इन्श्यूरन्स अॅड क्रेडिट गॅरेटी कॉरपोरेशनने (डीआयसीजीसी) बँक बुडाल्यास खातेदारांची काही रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष रिझर्व्ह फडंची तरतूद केली आहे. गेल्या काही वर्षांपासून 1 लाखांचे विमा कवच वाढवण्याची मागणी होत आहे. बदलत्या काळानुसार आता 1 लाख ही मोठी रकम नसल्याने ही मागणी होत आहे. बँकेतील गुतंवणूक सुरक्षित मानण्यात येत असल्याने खातेदार त्यांच्या आयुष्याची जमापुंजी बँकेतच ठेवतात. अशा परिस्थितीत बँक बुडाल्यास त्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे खातेदारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही मागणी होत आहे. पीएमसी बँक घोटाळ्यानंतर विम्याची रकम वाढवण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. पीएमसी बँकेत अनेक खातेदारांनी कोट्यवधींची गुतंवणूक केली आहे.

या मागणीबाबत सरकार सकारात्मक विचार करत असून विम्याची रकम वाढवण्यासाठी विचार सुरू असल्याचे अमित शहा यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. विम्याची रकम वाढवून अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे काळानुसार यात बदल होण्याची मागणी होत आहे. त्यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले होते. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये 13 डिसेंबरला रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत यावर विचार होण्याची शक्यता आहे. तसेच खातेदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्यास 25 लाखांपर्यंत विमा कवच देण्यासाठीही योजना आणण्याचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे एखादा खातेदार विम्यासाठी अतिरिक्त प्रिमियम देण्यास तयार असल्यास त्यावरही विमा रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावावरही विचार होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या